(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, कसबा-संगमेश्वरचे संस्थापक पैगंबरवासी काकासाहेब मुल्लाजी यांची ७४ वी पुण्यतिथी व शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील एस.एस.सी. व एच.एस.सी. परीक्षेत तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा न्यू इंग्लिश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कसबा येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. नियाज कापडी होते. प्रारंभी गीतमंचातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने वातावरण भारावून गेले. विद्यालयाचे प्राचार्य श्री. एच. जी. शेख यांनी प्रास्ताविकातून संस्थेचा गौरवशाली इतिहास, शाळेची शैक्षणिक प्रगती आणि विविध क्षेत्रांतील यशोगाथा उलगडून दाखविल्या. मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. इंग्रजी व मराठी माध्यमातील विद्यार्थी-शिक्षकांनी संस्थापक काकासाहेब व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचा उजाळा दिला. या निमित्ताने आयोजित निबंध स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
बोर्डाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना सोसायटीतर्फे आकर्षक चषक प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती कॅप्टन अकबर काझी यांच्या वतीने, तसेच पै. सईदा निसार काझी, पै. शरीफा हुसेन तांबोळी, कै. वैशाली विजय पानवलकर व कै. रामचंद्र गणेश जोशी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विविध विद्यार्थ्यांना चषक व रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील जिल्हा, विभागीय व राज्यस्तरीय निवड झालेल्या खेळाडूंचाही विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. इब्राहिम काझी, खजिनदार श्री. शिकुर गैबी, सदस्य श्री. मुराद काझी, निमंत्रित श्री. फैसल मोडक, पर्यवेक्षक श्री. एस. ए. पटेल, इंग्रजी माध्यम विभाग प्रमुख श्रीमती ए. एम. जुवळे, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका श्रीमती गुलशन बेग यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

