(दापोली)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या कोकणातील अग्रगण्य कृषी शिक्षण संस्थेला Indian Council of Agricultural Research (ICAR) कडून मानांकन प्रक्रियेत ‘A’ ग्रेड प्राप्त झाली आहे. २०२७ ते २०२९ या कालावधीसाठी देण्यात आलेल्या या मानांकनामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन आणि विस्तार कार्याची गुणवत्ता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
ICAR च्या मानांकन प्रक्रियेदरम्यान अध्यापन पद्धती, संशोधनाची गुणवत्ता, अत्याधुनिक सुविधा आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारे विस्तारकार्य या सर्व घटकांचा सखोल आढावा घेण्यात आला. या सर्व निकषांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत विद्यापीठाने ‘A’ ग्रेड मिळवली आहे.
गेल्या काही वर्षांत विद्यापीठाने कोकणातील शेतीला पूरक संशोधन, स्थानिक पिकांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न आणि शेतकऱ्यांशी सातत्याने ठेवलेला संवाद यामुळे हे यश शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यातही विद्यापीठ आघाडीवर राहिले आहे.
या मानांकनामुळे विद्यापीठाची राष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत झाली असून, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक, संशोधक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांचे हे यश असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे..या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध स्तरांतून विद्यापीठावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

