(दापोली)
दापोली ते मंडणगड महामार्गावर मंगळवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला. वीज वाहिनीला डंपरचा स्पर्श झाल्याने झालेल्या उच्चदाब विद्युत धक्क्यामुळे ही दुर्घटना घडली.
ही हृदयद्रावक घटना सकाळी सुमारे ११ ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान दापोली-मंडणगड मार्गावरील भवानी मार्बल दुकानासमोर घडली. अशफाक हुसेन आराइ (वय ६०) असे मृत चालकाचे नाव असून, ते डंपरमधून मातीची वाहतूक करत होते.
प्राथमिक माहितीनुसार, माती रिकामी करत असताना डंपरचा मागील भाग महावितरणच्या मुख्य वीज वाहिनीला लागला. त्यानंतर डंपरमध्ये उच्चदाबाचा विद्युत प्रवाह उतरला आणि चालकाला तीव्र विजेचा धक्का बसला. हा धक्का इतका जोरदार होता की, अशफाक यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मृत अशफाक हुसेन आराइ हे मूळचे ताडील गावचे असून सध्या दापोलीतील खोडा परिसरात वास्तव्यास होते. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
घटनेनंतर त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून महावितरणच्या वीज वाहिन्यांच्या सुरक्षिततेबाबत स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.

