( संगमेश्वर )
रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर ९ साप्ताहिक गाड्यांना थांबा देण्याची मागणी आता जोर धरत आहे. यासंदर्भात “निसर्गरम्य चिपळूण” आणि “निसर्गरम्य संगमेश्वर (रेल्वे)” या फेसबुक ग्रुपच्या वतीने कोकण रेल्वेचे रिजनल रेल्वे मॅनेजर शैलेश बापट यांची रत्नागिरी येथे भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
संगमेश्वर तालुका हा सुमारे १९६ गावांचा विस्तीर्ण भाग असून पर्यटनासाठी ओळखला जातो. मार्लेश्वर, कर्णेश्वर, प्रचितगड, भवानी किल्ला तसेच छत्रपती संभाजी महाराज स्मारक, शृंगारपूर यांसारख्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांमुळे येथे वर्षभर पर्यटकांची मोठी वर्दळ असते.
यापूर्वी नेत्रावती एक्सप्रेस, पोरबंदर एक्सप्रेस आणि जामनगर एक्सप्रेस या गाड्यांना संगमेश्वर रोड येथे थांबा मिळाल्यानंतर प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढल्याचे दिसून आले आहे. यामुळे या स्थानकाचे वाढते महत्त्व अधोरेखित झाले आहे. मात्र, अद्याप अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या येथे थांबत नसल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे पुढील ९ गाड्यांना संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे : केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस, अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेस, इंदौर सुपरफास्ट एक्सप्रेस, हापा सुपरफास्ट एक्सप्रेस, बांद्रा–मडगाव एक्सप्रेस, श्रीगंगानगर एक्सप्रेस, जबलपूर–कोकण एक्सप्रेस, दुरंतो एक्सप्रेस आणि मरूसागर एक्सप्रेस.
या गाड्यांना थांबा दिल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, तसेच स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कोकण रेल्वे प्रशासनाने या मागणीची सकारात्मक दखल घेऊन लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी व्यक्त केली.

