(विल्ये /अमित कांबळे)
रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्था यांच्या वतीने शुक्रवार, १७ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता वाटद-खंडाळा येथील अशोक मल्टीपर्पज सभागृहात भव्य ‘शेतकरी संवाद मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. कृषी क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान, शासकीय योजना, शेतीविषयक विविध समस्या तसेच कायदेविषयक मार्गदर्शन या विषयांवर तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
या मेळाव्याचे प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयातील सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅड. रोशन पाटील उपस्थित राहणार असून, ते शेतकऱ्यांना विविध कायदेशीर बाबींबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच उपकृषी अधिकारी प्रदीप भुवड, मंडळ कृषी अधिकारी वर्षा नवलकर, मंडळ कृषी अधिकारी विकास मेढे यांच्यासह खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश गावणकर शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. कृषी योजनांचा लाभ, आधुनिक शेती पद्धती, पीक व्यवस्थापन, शासकीय अनुदान आणि शेतीसमोरील विविध आव्हानांवर यावेळी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या संवाद मेळाव्यास खंडाळा, सैतवडे, जांभारी, कासारी, चाफेरी, जयगड, वरवडे तसेच परिसरातील सर्व शेतकरी बांधव आणि महिला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश गावणकर यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन त्यांच्या गावाजवळ उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना शेतीविषयक अद्ययावत माहिती, शासकीय योजनांचा लाभ आणि विविध प्रश्नांची थेट उत्तरे मिळविण्याची ही उत्तम संधी असल्याने या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

