(देवळे / प्रकाश चाळके)
फळपिक विमा आंबिया बहार सन २०२४-२५ मधील जिल्ह्यातील सर्व पात्र आंबा-काजू बागायतदार यांना विमा नुकसान भरपाई वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे पार पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकविमा रक्कम पात्र शेतकऱ्यांना वाटप होत असताना, रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी मात्र अजूनही या भरपाईसाठी वाट पाहत आहेत. २०२४ मध्ये भरलेला विमा हप्ता असूनही २०२५ चा हप्ता भरण्याची वेळ आली आहे, पण मागील वर्षीच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात धनादेश वितरणानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित आंबा-काजू बागायतदार शेतकऱ्यांना संबोधित केले. ते म्हणाले नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये ह्या वर्षी ज्या त्रुटी निर्माण झाल्या होत्या तशा प्रकारच्या त्रुटी यापुढे निर्माण होणार नाहीत याची संबंधित विमा कंपन्यांनी दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे ही आवश्यक आहे. यापुढे फळ पिक विमा नुकसान भरपाई वितारणा करिता विलंब होणार नाही याबाबत विमा कंपनीला सूचना दिल्या. विमा कंपनीच्या व्यस्थापक यांना योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्वं पात्र बागायतदार यांना देय विमा नुकसान भरपाई ची पूर्णत: रक्कम दिवाळीपूर्वी अदा करण्याच्या सूचना दिल्या. विमा कंपनीने त्या मान्य केल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकरी बांधव, उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना दीपावलीच्या शुभेच्छा देखील दिल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४२ हजार पात्र शेतकऱ्यांना सुमारे ९० कोटी रुपयांची विमा रक्कम वितरित केली जात आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे. “सिंधुदुर्गला विमा मिळतोय, मग रत्नागिरीला का नाही?” असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पिकाचे उत्पन्न घटल्याने अनेक शेतकऱ्यांना बँक व वित्तीय संस्थांचे कर्ज फेडताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. तरीही विमा कंपनीकडून नुकसानभरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडून त्वरित स्पष्टीकरणाची मागणी केली असून, अद्याप विमा रक्कम न मिळाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. शेतकऱ्यांनी विमा रक्कम त्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करण्याची मागणी केली आहे.

