(संगमेश्वर / एजाज पटेल)
“पोरी काय करणार? मुलगा असता तर आधार झाला असता…” या समाजाच्या टोमण्यांना संगमेश्वरच्या नम्रता मनिष देसाई हिने आपल्या कर्तृत्वाने चोख उत्तर दिले आहे. मांजरे-कळकदे सारख्या दुर्गम भागातून आलेल्या नम्रताने अवघ्या २० व्या वर्षी पोलीस दलात भरती होत खाकी वर्दीचा मान मिळवला आहे. जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर कोणतंही स्वप्न दूर नसतं हे तिने सिद्ध केलं आहे.
बापाचं स्वप्न, आईचे कष्ट… आणि लेकीची जिद्द
नम्रताचे वडील मनिष देसाई वॉचमन म्हणून काम करत रात्रंदिवस कष्ट करतात, तर आई शिवणकाम करून घर सांभाळते. घरात तीन मुली, मुलगा नाही… पण या आई-वडिलांनी कधीही त्याची खंत बाळगली नाही. “मुलगा नाही तर काय झालं, तुच मुलगा होऊन दाखव,” या वडिलांच्या शब्दांनी नम्रताच्या मनात जिद्दीचं बीज रोवलं. आईच्या हाताला शिवणकाम करताना पडलेले फोड आणि वडिलांनी रात्रीच्या पहाऱ्यात सोसलेली थंडी, हे सगळं पाहत नम्रताने खाकी वर्दीचं स्वप्न उराशी बाळगलं.
ना क्लास, ना अकॅडमी… स्वबळावर यश
आज अनेक जण महागड्या क्लासेस आणि सुविधा घेत तयारी करतात. पण नम्रताकडे त्या सुविधा नव्हत्या. बी.कॉम पदवी घेतल्यानंतरही आर्थिक परिस्थितीमुळे क्लास लावणं शक्य नव्हतं.
तरीही ती थांबली नाही. काही मित्रांसोबत ग्रुप तयार करून गावातच सराव सुरू केला. पहाटेच्या अंधारात धावणं, नियमित व्यायाम आणि अभ्यास या सगळ्याच्या जोरावर तिने स्वतःची वेगळी वाट तयार केली. कोणत्याही मोठ्या अकॅडमीशिवाय, केवळ स्वतःच्या मेहनतीवर तिने पोलीस भरतीत यश मिळवलं.
सोशल मीडियावर अभिमानाचा वर्षाव
नम्रताच्या यशाची वार्ता समजताच संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. ग्रामस्थ, मान्यवर यांनी तिचं कौतुक केलं. सोशल मीडियावरही तिच्या यशाची जोरदार चर्चा सुरू झाली. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपवर तिचे फोटो आणि यशोगाथा शेअर होत आहेत. अनेकांनी तिचा फोटो स्टेटस ठेवून ‘आपल्या लेकीचा’ अभिमान व्यक्त केला आहे.
खाकीचं स्वप्न पूर्ण… गावात जल्लोष
काकांकडून मिळालेली प्रेरणा आणि खाकीबद्दलची ओढ यामुळे नम्रताने हे स्वप्न पाहिलं. आज ते साकार झाल्यावर मांजरे-कळकदे गावात आनंदाचा जल्लोष झाला. ही केवळ नोकरी नाही, तर एका बापाच्या विश्वासाचा आणि एका लेकीच्या जिद्दीचा विजय आहे. तीन बहिणींमध्ये मोठी असलेल्या नम्रताने आज आपल्या बहिणींसाठी प्रेरणादायी मार्ग केलाआहे.
आता लक्ष्य अधिकारी पद
पोलीस शिपाई म्हणून निवड झाली असली तरी नम्रताची धडपड इथे थांबलेली नाही. “खाकी वर्दी मिळाली आहे, आता अधिकारी बनून समाजाची सेवा करायची,” असा तिचा निर्धार आहे.
नम्रताच्या यशानंतर वडील मनिष देसाई भावूक झाले होते. ते म्हणाले, “लोक विचारायचे, तीन मुली आहेत… म्हातारपणी आधार कोण? या प्रश्नांनी मनाला वेदना व्हायच्या. पण आज नम्रताने खाकी वर्दी मिळवून त्या सगळ्यांना उत्तर दिलं आहे. रात्रभर पहारा देताना जी थंडी सहन केली, ती आज लेकीच्या यशामुळे उबदार वाटते. आज मी अभिमानाने सांगू शकतो की, मी एका शूर पोलीस कन्येचा बाप आहे. तिने माझं स्वप्न पूर्ण केलं.”
नम्रताच्या आईनेही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं, “संघर्ष आमच्या आयुष्यात नवा नव्हता, पण नम्रताने कधी हार मानली नाही. लोक काय म्हणतात याकडे लक्ष न देता आम्ही तिच्या स्वप्नांना साथ दिली. माझ्या शिवणयंत्राची सुई आणि तिच्या अभ्यासाची वही यांनी मिळून हे यश विणलं आहे. आज ती पोलीस झाली, याचा आनंद आहेच; पण तिने जगाला दाखवलं की शांतपणे केलेली मेहनत एक दिवस मोठा आवाज करते.”
संगमेश्वरच्या या लेकीने केवळ नोकरी मिळवली नाही, तर समाजातील जुनाट विचारांना ठाम उत्तर दिलं आहे. नम्रता देसाईचं यश आज अनेक मुलींसाठी प्रेरणेचा दीप ठरत आहे.

