(रत्नागिरी /प्रतिनिधी)
तालुक्यातील संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य मोटार-बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक ऐक्य, संविधानिक मूल्यांची जपणूक आणि आंबेडकरी विचारांचा जागर यासाठी ही रॅली विशेष ठरणार आहे.
सोमवार, दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता या रॅलीला प्रारंभ होणार असून, रत्नागिरी तालुक्यातील सर्व मोटार व दुचाकीधारकांनी आपल्या वाहनांवर पंचशील ध्वज लावून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. रॅलीचा प्रारंभ मंगळवार आठवडा बाजार, नाचणे येथून होणार असून, सालवी स्टॉप, मारुती मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, आठवडा बाजार, गाडीतळ, मच्छी मार्केट अशा प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज कालीन बुद्धविहार येथे समारोप होणार आहे.
दरम्यान, या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला असून, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात रॅली पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

