(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर सहलीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबावर काळाने भीषण आघात केला. फेसाळणाऱ्या लाटांमध्ये खेळताना खोल पाण्यात ओढल्या गेलेल्या तिन्ही मुलांना वाचवण्यासाठी वडिलांनी जीवाची बाजी लावत अथांग समुद्राशी झुंज दिली. त्यांनी दोन मुलांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले; मात्र दुर्दैवाने आपल्या जिवलग लेकाला वाचवण्यात अपयश आले. श्रेयश सागर गोसावी (वय १३) या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाल्याने तांदूळवाडी आणि मेर्वी परिसरात शोककळा पसरली आहे.
मूळ सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील सागर मोहन गोसावी हे सध्या रत्नागिरीतील मेर्वी येथे वास्तव्यास असून भंगार व्यवसाय करतात. शुक्रवारी दुपारी शाळा लवकर सुटल्याने त्यांनी मुलगा श्रेयश, मुलगी आरोही आणि पुतण्या देवराज यांना घेऊन गावखडी येथील सुरूच्या बनात फेरफटका मारण्यासाठी नेले होते. दुपारच्या सुमारास तिन्ही मुले समुद्रकिनाऱ्यावर खेळत असताना अचानक आलेल्या प्रचंड लाटांच्या ओढीमुळे ती खोल पाण्याकडे खेचली जाऊ लागली. ही धोकादायक परिस्थिती पाहताच सागर गोसावी यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात उडी घेतली. प्रचंड लाटांशी झुंज देत त्यांनी प्रथम मुलगी आरोही आणि पुतण्या देवराज यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले. मात्र, श्रेयशला वाचवण्यासाठी ते पुन्हा समुद्राकडे धावले असता तोपर्यंत लाटांनी त्याला खोल पाण्यात ओढून नेले होते.
घटनेची माहिती मिळताच पूर्णगड सागरी पोलीस, स्थानिक यंत्रणा आणि ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. अंधारामुळे शुक्रवारी शोधकार्य थांबवावे लागले. अखेर शनिवारी सकाळी सुमारे आठच्या सुमारास श्रेयशचा मृतदेह गावखडी किनाऱ्यावर तरंगताना आढळून आला. स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर, पावस येथे सहावीत शिक्षण घेणाऱ्या श्रेयशच्या निधनाची बातमी समजताच शाळेत शोककळा पसरली. विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून शाळा बंद ठेवण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
दरम्यान, आपल्या डोळ्यादेखत मुलगा हिरावला गेल्याने गोसावी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, श्रेयशच्या पार्थिवावर मूळ गावी तांदूळवाडी येथे साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. एका पित्याने जीवाची पर्वा न करता दिलेली झुंज आणि त्यातच मुलाला गमावण्याची ही हृदयस्पर्शी घटना संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे.

