(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत, तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आमदार किरण सामंत यांनी दिली. तसेच, राजापूर ग्रामीण रुग्णालयाला लवकरच उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यात येईल आणि प्रलंबित मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्नही मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजापूर ग्रामीण रुग्णालयातील रक्त साठवणूक केंद्राचे उद्घाटन आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला सभापती सौ. नंदिनी कदम, उपसभापती अभिजीत गुरव, शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी लोकरे, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. राम मेस्त्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. सामंत यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मेडिकल कॉलेज सुरू असून, भविष्यात डेंटल, आयुष आणि होमिओपॅथी कॉलेज सुरू करण्याची योजना आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता भासणार नाही.
तालुक्यातील जीर्ण अवस्थेतील प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती, तसेच कर्मचारी निवासस्थानांचे नूतनीकरण या कामांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या ७ तारखेला मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये मतदारसंघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला जाणार आहे.
याच बैठकीत राजापूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देणे आणि वाटूळ येथे प्रस्तावित मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक निधी मिळवणे यासाठीही पाठपुरावा केला जाणार आहे. हॉस्पिटलसाठी जागा उपलब्ध असून, आता निधी मिळवणे हे पुढील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे आ. सामंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उपसभापती अभिजीत गुरव यांनी १०८ रुग्णवाहिकांबाबत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. सध्या या रुग्णवाहिका प्रामुख्याने रत्नागिरीपर्यंतच सेवा देतात, मात्र काही वेळा रुग्णांना कोल्हापूर येथे हलवणे आवश्यक असते. अशा वेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे कोल्हापूरपर्यंत सेवा देणाऱ्या १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचे निदर्शनास आणून दिले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, तसेच ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

