(दापोली)
मळे गावातील फिलसेवाडी येथे दिनांक 26 सप्टेंबर रोजी कृषी जीविका गटाच्या वतीने माहिती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम स्थानिक मीटिंग हॉलमध्ये सायं. ४ वाजता मोठ्या उत्साहात पार पडला.
माहिती केंद्रात पिकांच्या सुधारित जाती, खते, लाखीबाग, मृदा नमुना पद्धती, पशुखाद्य तसेच विविध शासकीय योजनांची माहिती असलेले फलक प्रदर्शित करण्यात आले होते. याशिवाय आधुनिक कृषी अवजारे, अजोला संवर्धन, विविध बियाणे, सेंद्रिय खते आणि पशुखाद्याचे नमुने देखील शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आले होते. या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक व शास्त्रीय शेती पद्धतींची माहिती करून देणे हा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच श्री. दिनेश अडविलकर यांच्या हस्ते झाले. गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे गावातील शाळेतील विद्यार्थीही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले व त्यांनी कृषीविषयक विविध माहिती उत्साहाने आत्मसात केली. चार्ट्स व प्रात्यक्षिक साहित्यावरील माहिती पाहून शेतकरी प्रभावित झाले व त्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची नोंद पुढील मार्गदर्शनासाठी करण्यात आली.
या प्रसंगी RAWE कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण झगडे व कृषी अर्थशास्त्र विषय तज्ज्ञ डॉ. दीपक मळवे उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले व शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रेरणा मिळाली.

