(दापोली / प्रतिनिधी)
दापोली तालुक्यात हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हर्णे-आंजर्ले बायपास मार्गावरील एका हॉटेलच्या आवारात चारचाकी वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने अवघ्या तीन वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दि. ८ जून रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हर्णे-आंजर्ले बायपास मार्गावरील हॉटेल लेमन ट्रीच्या आवारात ही दुर्घटना घडली. तक्रारदार गणपती प्रेमू राठोड (वय ३८, व्यवसाय मजुरी) यांची मुलगी सान्वी (वय ३ वर्षे ८ दिवस) ही हॉटेल परिसरातील वडाच्या झाडाखाली झोपलेली होती.
याचवेळी आरोपी बापू हिरामण पवार (रा. जालगाव सुतार कोंड) हे त्यांच्या ताब्यातील क्रेटा कार (क्रमांक MH-08-AN-5887) मागे घेत होते. वाहन मागे घेताना पुरेशी सावधगिरी न बाळगता आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे गाडीचे चाक चिमुरडी सान्वीच्या डोक्यावरून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या भीषण अपघातात सान्वीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. राठोड कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

