(चिपळूण)
चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला रविवार, दि. १२ एप्रिलपासून चिपळूण येथे उत्साहात प्रारंभ होत आहे. शहरातील पवन तलाव मैदानावर रंगणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास मुंबईचे माजी रणजीपटू व निवड समिती सदस्य सुनील मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी दिली.
या उद्घाटन सोहळ्याला आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, सभापती सूर्यकांत खेतले, उपसभापती संदेश आयरे यांच्यासह नगरसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
क्रिकेट क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, तंत्रशुद्ध फलंदाजी आणि मुंबई क्रिकेटमधील भक्कम कारकीर्द यामुळे सुनील मोरे हे नाव क्रिकेटप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेची प्रतिष्ठा अधिक वाढेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
सुनील मोरे यांनी १९९२ ते १९९६ या कालावधीत मुंबई संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्या काळात सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर आणि अमोल मुझुमदार यांसारख्या दिग्गज खेळाडूंसोबत खेळताना त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. २५ प्रथम श्रेणी सामन्यांत ४४ च्या सरासरीने १५०३ धावा करत त्यांनी संघाला अनेक वेळा भक्कम सुरुवात करून दिली.
मुंबईतील स्थानिक क्रिकेटमध्येही त्यांनी नॅशनल क्रिकेट क्लब आणि दादर युनियन स्पोर्टिंग क्लबकडून टाइम्स शिल्ड व कांगा लीगसारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच इंग्लंडमधील सॉमरसेट संघाकडून खेळताना त्यांनी काउंटी क्रिकेटचा अनुभवही घेतला आहे.
विशेष म्हणजे, १९९० च्या दशकात चिपळूण येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे अनेक वर्षांनंतर त्यांचे पुन्हा चिपळूणमध्ये आगमन होत असल्याने स्थानिक क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे.
या स्पर्धेमुळे स्थानिक आणि राज्यभरातील तरुण खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे. तसेच सुनील मोरे यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूकडून मार्गदर्शन घेण्याची संधी मिळणार असल्याने स्पर्धेचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे.

