(रत्नागिरी)
तालुक्यातील कोतवडे उंबरवाडी येथे एका ३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शैलेश रवींद्र पवार असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शैलेशचे वडील रवींद्र गणपत पवार हे सकाळी नेहमीप्रमाणे गवंडी कामासाठी सडये येथे गेले होते, तर आई अंगणवाडीत कामासाठी गेली होती. त्या वेळी शैलेश घरात एकटाच होता.
दुपारी साडेबाराच्या सुमारास आई घरी परतली असता घराचे दरवाजे व खिडक्या आतून बंद असल्याचे आढळले. काही वेळाने वडीलही घरी परतल्यानंतर त्यांनी मागील दरवाजातून घरात प्रवेश केला. आत प्रवेश करताच हॉलमध्ये शैलेशने लाकडी बाराला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हे दृश्य पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. वडील रवींद्र पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

