(चिपळूण)
श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या बी. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाने आरोग्याबाबत प्रबोधन घडविणारी ‘ड्रीम हेल्थ पार्क’ ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन २० ऑक्टोबर २०१८ रोजी पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर आणि डॉ. टी. रामासामी यांच्या हस्ते झाले होते.
सुमारे १६०० चौ. मीटर जागेत उभारलेले हे हेल्थ पार्क मुख्यत्वे १० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी विकसित करण्यात आले आहे. बालपणी घडणाऱ्या सवयी व संस्कार जीवनभर कायम राहतात, या जाणिवेतून या पार्कमध्ये आहार, विहार, आचार, शारीरिक सवयी, मानसिक आरोग्य या सर्व बाबींवर खेळत-खेळत मार्गदर्शन केले जाते.
विद्यार्थी येथे प्रवेश करताच आपली उंची, वजन व बॉडी मास इंडेक्स तपासतात. स्थूल मुलांनी कोणता आहार टाळावा आणि कोणता स्वीकारावा याबाबत मार्गदर्शन मिळते. रक्तक्षय कसा ओळखावा, त्यावर कोणत्या फळभाज्यांचा आहारात समावेश करावा, हेही प्रत्यक्ष पाहता येते. जंक फूड व चायनीज पदार्थातील मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी)चे दुष्परिणाम समजावून सांगितले जातात. विद्यार्थी प्रत्यक्ष ठिकाणी पाहून ‘हे हानिकारक पदार्थ मी टाळणारच’ असा निर्धार करतात.
दृष्टी तपासणीसाठी चार्ट्स, जीवनसत्व ‘अ’ असलेले पदार्थ, स्क्रीन टाइमचे दुष्परिणाम याची माहिती मिळते. मानसिक ताण ओळखण्यासाठी खेळ तसेच योग व ध्यान याचे प्रयोगही अनुभवता येतात. तरुणांसाठी लैंगिक शिक्षण, मासिक पाळी व गर्भनिरोधक या विषयांवर समज वाढविणारी मॉडेल्स उपलब्ध आहेत.
पार्कमध्ये अनवाणी चालणे, वृक्षारोपण, प्राणवायूचा लाभ, भारतीय संस्कृतीतील सणोपयोगी पदार्थांचे महत्त्व यावरही माहिती दिली जाते. भूगोल व इतिहासाबाबत देशप्रेम वृद्धिंगत करणारी मॉडेल्स तयार करण्यात आली आहेत.
आजवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पाटण, सातारा, कराड, मुंबई, पुणे, ठाणे आदी भागांतील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे १५ हजार विद्यार्थी व खेळाडूंनी या हेल्थ पार्कला भेट दिली आहे.
भविष्यातील आजारांवर प्रतिबंध करण्यासाठी प्रबोधन हा नवा विचार घेऊन ‘भ. क. ल. वालावलकर रुग्णालय’ हा उपक्रम राबवत आहे, असे संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांनी सांगितले.

