(चिपळूण)
विपुल निसर्गसंपदेने नटलेल्या कोकणाचे वैभव सकारात्मक, वास्तववादी आणि दीर्घकालीन दृष्टीने मांडले गेले पाहिजे. कोकणाच्या तुलनेत कॅलिफोर्निया केवळ दहा टक्के आहे. कोकण म्हणजे खरा निसर्ग, तर कॅलिफोर्नियामध्ये कृत्रिमता आहे. त्यामुळे कोकणातील निसर्ग टिकवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे स्पष्ट प्रतिपादन मराठी भाषा, उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
राज्यात प्रथमच कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने मांडकी–पालवण येथे आयोजित ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन शनिवारी पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन ना. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
साहित्य संमेलने शासनाला दिशा देणारी ठरली पाहिजेत
उदय सामंत म्हणाले की, साहित्य संमेलने केवळ चर्चेपुरती मर्यादित राहू नयेत. त्यातून शासनाला ठोस दिशा मिळाली पाहिजे. यंदाचे विश्व मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होत असून हे कुसुमाग्रजांचे गाव आहे. जगभरातील मराठी भाषिक येथे यावेत, हा या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश आहे. सीमा भागातील मराठी ग्रंथालयांना शासनाकडून अनुदान देण्यात आले असून, त्यातून अनेक वाचनालये उभी राहत आहेत. मातृभाषा टिकवण्यासाठी आणि मराठी अधिक समृद्ध करण्यासाठी अशा साहित्य संमेलनांची नितांत गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकारणावर टीका म्हणजे साहित्य संमेलनांची परंपरा
साहित्य संमेलनात राजकारण्यांवर टीका केली जाते, हे नवे नाही. मात्र राजकारणातही कलाकारांची काही कमी नाही. काही राजकारणी तर चोवीस तास मेकअप लावूनच असतात, अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली. साहित्य संमेलनात राज्यकर्त्यांचा उद्धार झाल्याशिवाय संमेलन पूर्ण होत नाही, हेच त्यांचे महत्व अधोरेखित करते. मात्र साहित्य संमेलनात शासनाचा हस्तक्षेप असणार नाही, ही भूमिका त्यांनी पुन्हा ठामपणे मांडली.
कोकण सुपुत्रांचा गौरव आणि विकासाचा मार्ग
कोकण सुपुत्रांचा सन्मान करताना त्यांनी बॅरिस्टर नाथ पै यांच्या कार्याचा उल्लेख केला. राजकारण्यांनी त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालले, तर कोकणचा विकास निश्चित होईल, असे ते म्हणाले. कोकण रेल्वेचे निर्माते मधू दंडवते यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला, तर चरित्रकार धनंजय कीर यांचे नाव रत्नागिरी उपकेंद्राला देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
आदर्श गावे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन
पद्मश्री पोपटराव पवार यांच्या कार्याचा उल्लेख करताना उदय सामंत म्हणाले की, जिल्ह्यातील पाच ते दहा गावे आदर्श झाली पाहिजेत. या निवडीत आमदार भास्कर जाधव यांच्या मतदारसंघातील दोन गावांचाही समावेश असेल. या गावांना पद्मश्री पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन दिले जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
कृषी विद्यापीठे संशोधनाची केंद्रे बनली पाहिजेत
कोकण कृषी विद्यापीठाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, कृषी विद्यापीठे ही केवळ शिक्षणाचीच नव्हे तर संशोधनाची सशक्त केंद्रे झाली पाहिजेत. येथून सक्षम शास्त्रज्ञ घडले पाहिजेत, जे शेतकऱ्यांना संकटाच्या काळात त्वरित मदत करू शकतील. लागलेली कीड त्याच वर्षी गेली पाहिजे, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. कृषी विद्यापीठांमध्ये सुमारे २५ हजार एकर जमीन पडीक असून, तिचा संशोधनासाठी वापर व्हायला हवा, असे त्यांनी नमूद केले.
मराठी भाषा ही जगातील प्रगत भाषा असून महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती राहील, हे त्यांनी ठामपणे सांगितले. कार्यक्रमाला उशिरा पोहोचल्याबद्दल आयोजक, साहित्यिक, साहित्यप्रेमी व नागरिकांची त्यांनी जाहीर माफीही मागितली.
साहित्यिकांनी सकारात्मक लेखन करावे
संमेलनाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे म्हणाले की, शासनाच्या सहकार्यामुळे राज्यातील पहिले ग्रामीण साहित्य संमेलन येथे होऊ शकले. साहित्यिकांनी नेहमी सकारात्मकता मांडली पाहिजे. भाषा आणि समाजामध्ये वाद, विद्वेष निर्माण होईल असे लेखन टाळावे. बोलीभाषा टिकवण्यासाठी आणि मराठी अधिक समृद्ध करण्यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे.
स्वागताध्यक्ष व कुलगुरू डॉ. संजय भावे म्हणाले की, जगात शेती आणि शिक्षण हेच खऱ्या अर्थाने शाश्वत आहे. सध्याच्या ग्रामीण लेखनामध्ये शेती, संशोधन आणि त्यातील समस्या पुरेशा प्रमाणात येत नाहीत. साहित्यिकांनी या विषयांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
पुस्तक प्रकाशन आणि मान्यवरांची उपस्थिती
यावेळी डॉ. तानाजीराव चोरगे लिखित ‘आंदोलन’ या पुस्तकाचे तसेच संमेलन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले, तर आभार अरुण इंगवले यांनी मानले.
या संमेलनाला आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, पद्मश्री पोपटराव पवार, चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ, रत्नागिरी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, साहित्य संमेलन संयोजन समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह डॉ. निखिल चोरगे, संपादक सागर देशपांडे, दैनिक सागरच्या संपादक शुभदा जोशी यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

