(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील हातखंबा येथील महामार्गावरील नव्या पुलावरून वाहतूक सुरू होऊनही वाहनचालकांच्या अडचणी काही संपताना दिसत नाहीत. जुन्या हातखंबा–पाली मार्गावरील अपघातप्रवण तीन धोकादायक वळणे काढून टाकून नव्या मार्गिकेवर वाहतूक वळविण्यात आल्याने अपघातांची भीती काही प्रमाणात कमी झाली असली, तरी आता खड्ड्यांनी ग्रासलेल्या रस्त्यामुळे महामार्ग पुन्हा एकदा धोक्याचा ठरत आहे.
नव्या पुलावर आणि त्यालगतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, त्यातून भरधाव वेगात धावणारी वाहने वाहनचालकांसाठी जीवघेणी ठरत आहेत. महामार्गावर काम करणाऱ्या ईगल कंपनीच्या जड वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिघडल्याचे चित्र आहे. कंपनीच्या ट्रकचालकांचा बेदरकारपणा आणि महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष यामुळे अपघातांना निमंत्रण दिले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
हातखंबा हायस्कूल ते हातखंबा मराठी शाळेच्या बाजूने नव्या पुलाची आखणी करण्यात आली. पुलाचे काम सुरू असताना या परिसरात एकामागून एक अपघात घडत होते. या अपघातांत काहींना आपले प्राणही गमवावे लागले होते. त्यामुळे नव्या पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर तरी सुरक्षितता मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात पुलावर व रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची डोकेदुखी कायम आहे. याच रस्त्यावरून दिवसेंदिवस प्रचंड धूळ उडत असून, ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे याच मार्गावरून पालकमंत्र्यांचा ताफाही नियमितपणे ये-जा करतो. तरीही या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
जीवितहानी झाल्यावरच जाग येणार?
ठेकेदार ईगल कंपनीकडून सुरू असलेली बेजबाबदार वाहतूक, ट्रकचालकांचा बेदरकार वेग आणि रस्त्याची अक्षरशः वाट लागलेली अवस्था असूनही महामार्ग प्राधिकरणातील अधिकारी मौन का बाळगून आहेत, हा कळीचा मुद्दा आहे. कंत्राट दिल्यानंतर कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी प्राधिकरणाची नाही का? की अपघात, जीवितहानी झाल्यावरच जाग येणार? पुलाचे काम सुरू असताना एकामागून एक अपघातामध्ये काहींना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर तरी या विभागाने धडा घेतला पाहिजे होता. मात्र आता नव्या पुलावर वाहतूक सुरू झाल्यानंतरही खड्डे, खड्डेमय रस्ता आणि धुळीचे साम्राज्य कायम आहे. याला जबाबदार कोण? ठेकेदार की त्याच्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी? असे प्रश्न उपस्थित होत आहे.

