(रत्नागिरी)
पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित ‘जनता दरबार’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध विभागांशी संबंधित एकूण १६९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी सुमारे ९० टक्के अर्जांचा निपटारा जागेवरच करण्यात आला, तर उर्वरित प्रलंबित अर्जांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाठपुरावा करून अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
दरबारात अधिकाऱ्यांनी तत्परतेने काम केल्याबद्दल पालकमंत्री सामंत यांनी त्यांचे कौतुक केले. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपाध्यक्ष विलास चाळके, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जनतेच्या सोयीसाठी प्रशासनाने तळमजल्यावर नोंदणी कक्ष व टोकन व्यवस्था, तर दुसऱ्या मजल्यावर प्रतीक्षा कक्ष अशी सुविधा उपलब्ध करून दिली होती. सुमारे तीन ते साडेतीन तास पालकमंत्री आणि अधिकारी नागरिकांचे प्रश्न ऐकून त्यांचे निराकरण करत होते.
या दरबारात भूसंपादन मोबदला, रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरण, मुख्यमंत्री सडक योजना, वीजपुरवठा खंडित होणे, पोल शिफ्टिंग, प्रधानमंत्री आवास योजना, जमीन विषयक अडचणी, बीएसएनएल टॉवर, नळपाणी, गृहनिर्माण सोसायटी, माजी सैनिकांचे प्रश्न तसेच नुकसान भरपाई आदी विविध मुद्द्यांवर नागरिकांनी मांडणी केली. अनेक प्रकरणे तत्काळ निकाली निघाल्याने नागरिक समाधानाने परतले.
पालकमंत्री सामंत यांनी काही महत्त्वाच्या सूचना देताना सांगितले की, शेतामधील वीज खांब तातडीने शेताच्या बांधावर हलवावेत आणि यासाठी आवश्यक निधी महावितरणने स्वतःच्या स्तरावर उपलब्ध करावा. धनगरवाड्यांतील थ्री फेज व सिंगल फेज वीज जोडण्याबाबत १५ दिवसांत अहवाल सादर करावा. तांडा वस्तीतील निधीतून आवश्यक कामे करण्याचा विचार करावा. तसेच, गावातील पारंपरिक रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंद अधिकृत नोंदीत (२३ व २६) करण्यात यावी.
एसटी बस थांब्यांसाठी स्वच्छ शौचालये, महिला सुरक्षा आणि अधिकृत सुविधा असलेल्या ठिकाणांची निवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश देत, माजी सैनिकांना योग्य मान-सन्मान मिळावा यासाठी परिपत्रक काढण्याचेही आदेश देण्यात आले. आरजीपीपीएल सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नांवर व्यवस्थापनासोबत स्वतंत्र बैठक घेण्याचे, तसेच झोपडपट्टीतील कामगारांची नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. जनता दरबारासाठी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

