(पिंपरी-चिंचवड / पुणे)
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून इमारत ढासळल्याच्या भीषण दुर्घटनेनंतर चौथ्या दिवशीही बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आठ जणांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), महापालिकेचे अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणा संयुक्तपणे प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप या आठ जणांचा शोध लागलेला नाही.
या दुर्घटनेत सुरुवातीला नऊ कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. उर्वरित आठ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
बचावलेल्या कामगारांच्या माहितीवरून आखली नवी रणनीती
बचाव मोहिमेदरम्यान सुरक्षित बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांकडून महत्त्वाची माहिती घेण्यात आली आहे. त्यांच्या सांगण्यानुसार आत अडकलेल्या व्यक्तींचे संभाव्य स्थान निश्चित करण्यात आले असून त्याच दिशेने बचाव पथकाने लक्ष केंद्रित केले आहे. समोरील मार्ग पूर्णपणे बंद झाल्याने इमारतीच्या मागील बाजूने सुरक्षित प्रवेशमार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
काँक्रिटचा भाग फोडण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा वापर
दुर्घटनाग्रस्त इमारतीत सुरक्षित प्रवेश मिळावा यासाठी अत्याधुनिक डिमोलीशन एक्सकॅव्हेटर मशीन घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. या यंत्राद्वारे इमारतीचा अस्थिर काँक्रिटचा भाग नियंत्रित पद्धतीने हटविण्यात येत असून बचाव पथकासाठी नवीन मार्ग तयार केला जात आहे. बचावकार्याला अधिक गती देण्यासाठी आणखी एक अत्याधुनिक मशीनही घटनास्थळी दाखल करण्यात आले आहे.
दुर्घटनेला चार दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला असला तरी बचाव पथकाने आशा सोडलेली नाही. जेसीबी, पोकलेन, डंपर आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मलबा हटविण्याचे काम सुरू असून अडकलेल्या व्यक्तींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत ९ कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, उपचारादरम्यान एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अद्याप ८ कामगार कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. चार दिवसांहून अधिक काळ त्यांचा शोध सुरू असल्याने बेपत्ता कामगारांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या आतील व्हिडिओ समोर
मोशी कचरा डेपोतील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या आतील भागाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये इमारतीच्या आत दबलेले कार्यालयीन टेबल, साहित्य आणि काही उपकरणे दिसत आहेत. या दृश्यांमुळे बचाव मोहिमेतील अडचणींची कल्पना येत आहे.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली असून, आपल्या नातेवाईकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याची मागणी केली जात आहे. “बचाव पथकाने सुरक्षित आणि जलद पद्धतीने मोहीम राबवून आमच्या माणसांना बाहेर काढावे,” अशी भावना कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे.
अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने शोधकार्य सुरू
कचऱ्याचा ढिगारा मोठ्या प्रमाणात आणि खोल असल्याने बचाव पथकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जेसीबी, पोकलेन, डंपर, अत्याधुनिक यंत्रसामग्री तसेच श्वान पथकाच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, जोपर्यंत शेवटचा व्यक्ती सुरक्षित बाहेर काढला जात नाही, तोपर्यंत बचावकार्य सुरूच राहणार आहे.
महेश कुंभारच्या कुटुंबीयांना आशा
या दुर्घटनेत छत्रपती संभाजीनगर येथील ३२ वर्षीय महेश कुंभार अडकला आहे. महेश हा वेस्ट एनर्जी प्रकल्पात एचआर म्हणून कार्यरत होता. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याचा भाऊ संतोष कुंभार तातडीने घटनास्थळी दाखल झाला.
“काहीतरी चमत्कार घडावा आणि माझा भाऊ सुखरूप बाहेर यावा,” अशी आशा संतोष कुंभार यांनी व्यक्त केली आहे. महेशशी संपर्क साधण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र अद्याप त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, उपलब्ध सर्व संसाधनांचा वापर करून बचावकार्य अधिक वेगाने सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून मोहिमेवर सातत्याने देखरेख ठेवत आहेत.
एनडीआरएफचे कमांडंट प्रवीण धट्ट यांनी सांगितले की, बचावलेल्या कामगारांकडून मिळालेल्या माहितीनुसार बचावकार्याचे नियोजन करण्यात आले असून अडकलेल्या व्यक्तींपर्यंत शक्य तितक्या लवकर पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने उचलले जात असून बचाव मोहिमेला अधिक वेग देण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत.

