(फुणगुस / एजाज पटेल)
ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिक आरोग्यदृष्ट्या सक्षम व्हावा आणि गावाच्या उंबरठ्यावरच दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शासनाची ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. या उपक्रमाचा उद्देश केवळ उपचारापुरता मर्यादित नसून, स्वच्छतेबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक लसीकरण आणि आजारांचे वेळेवर निदान करून संपूर्ण गाव निरोगी ठेवणे हा आहे.
याच मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र फुणगुस अंतर्गत कोंडअसुर्डे उपकेंद्राच्या वतीने मौजे असुर्डे, जाधववाडी येथे नुकतेच आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. आग्रे यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांची सखोल आरोग्य तपासणी केली. तसेच हवामानातील बदलामुळे उद्भवणारे आजार आणि वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
या शिबिरात आरोग्य सेविका श्रीमती गोसावी, मदतनीस श्रीमती देवळेकर, वाहन चालक श्री. सुतार तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. शिबिर यशस्वी करण्यासाठी आशा स्वयंसेविका श्रीमती घाग, श्रीमती मूरकर, श्रीमती खानविलकर तसेच अंगणवाडी सेविका श्रीमती जाधव आणि श्रीमती पवार यांनी घरोघरी भेट देत नागरिकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.
शिबिरादरम्यान ग्रामस्थांच्या रक्तदाब, मधुमेह यांसारख्या विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. महिला व बालकांच्या आरोग्यावर विशेष भर देत आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.
या उपक्रमाला जाधववाडी व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला. शासनाच्या या उपक्रमामुळे दुर्गम भागातील जनतेला मोठा दिलासा मिळत असून, गावागावात आरोग्याबाबत जागरूकता वाढत असल्याचे चित्र दिसून आले. स्थानिकांनी आरोग्य विभागाचे आभार मानत संपूर्ण गाव निरोगी करण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

