(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत गाव बैठक उत्साहात पार पडली. ग्रामस्थांनी रस्ते, पाणीपुरवठा, वीज समस्या, शेतकऱ्यांच्या अडचणी, आरोग्य आणि शिक्षण सुविधा यांसह अनेक प्रश्न मांडले.
ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून आमदार सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच कार्यवाहीचे आदेश दिले. काही प्रकरणांमध्ये तातडीने निर्णय घेऊन लोकांना दिलासा देण्यात आला.
वैयक्तिक प्रश्नांना प्राधान्य
ग्रामस्थांनी रेशनकार्ड, आधारकार्ड दुरुस्ती, पेन्शन, शिष्यवृत्ती, शेतकरी योजना, घरकुल मंजुरी अशा वैयक्तिक तक्रारी मांडल्या. रेशनकार्ड बंद करण्याच्या मुद्द्यावर नागरिकांनी पुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावर आमदार सामंत यांनी कठोर भूमिका घेत “ज्यांची कार्डे बंद आहेत, ती त्वरित सुरू करा. पुढे कोणतीही तक्रार राहता कामा नये,” असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
ग्रामविकासावर भर
बैठकीत आमदार सामंत म्हणाले, गावाच्या विकासासोबतच प्रत्येक नागरिकाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे हीच खरी जबाबदारी आहे. वैयक्तिक प्रश्न सोडवल्यावरच विकासप्रक्रिया यशस्वी ठरेल. बचत गटांच्या माध्यमातून उद्योगधंदे सुरू करून शासनाच्या अनुदानाचा लाभ घ्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पंचक्रोशीसाठी कायमस्वरूपी पशुवैद्यकीय डॉक्टर नेमण्याचे आश्वासन दिले. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व शिक्षण यांसंबंधी प्रलंबित कामे मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
गावातील नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत दिलेल्या तात्काळ निर्णयांमुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

