(संगमेश्वर)
पुर्ये गावात पुन्हा एकदा क्रिकेटचा उत्सव रंगणार असून पुर्ये प्रीमियर लीग पर्व ३ (PPL Season 3) बद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मागील वर्षी झालेल्या पुर्ये प्रीमियर लीग पर्व २ (२०२५) मध्ये गंगादेवी वॉरियर्स संघाने विजेतेपद पटकावले होते, तर शिंदे चॅलेंजर्स संघ उपविजेता ठरला होता. यंदा मात्र नव्या संघांच्या सहभागामुळे स्पर्धेचा थरार अधिक वाढला आहे.
या वर्षी पुर्ये प्रीमियर लीग पर्व ३ साठी एकूण ८ संघ मैदानात उतरणार असून विजेतेपदासाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. सहभागी संघ पुढीलप्रमाणे आहेत – गंगादेवी वॉरियर्स, रायझिंग स्टार, पवार वॉरियर्स, मोरे ब्लास्टर, देवा ऑटो ११, शिंदे चॅलेंजर्स, ब्रदर्स ११, दत्तगुरु पुर्ये
“आई गंगादेवी क्रिकेट संघ मुंबई व ग्रामीण” यांच्या वतीने आयोजित ही भव्य क्रिकेट स्पर्धा दि. १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी पुर्ये ग्रामपंचायतजवळील घोडेकरी मैदानावर पार पडणार आहे. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण SS Events या माध्यमातून करण्यात येणार असून क्रिकेटप्रेमींना मैदानासह मोबाईल व डिजिटल माध्यमातूनही सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.
ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नसून कला, क्रीडा, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून गावातील तरुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, मुलांमध्ये एकोपा निर्माण व्हावा आणि स्पर्धेतून होणाऱ्या उत्पन्नातून विविध सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा उपक्रम राबवता यावेत, या उद्देशाने आयोजित करण्यात आली आहे.
- पारितोषिकांची आकर्षक रचना
पुर्ये प्रीमियर लीग २०२६ साठी पुढीलप्रमाणे पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत – - प्रथम क्रमांक: ₹ 21,221 रोख आणि आकर्षक चषक
- द्वितीय क्रमांक: ₹ 15,115 रोख आणि आकर्षक चषक
- तृतीय क्रमांक: ₹ 11,111 रोख आणि आकर्षक चषक
- शिस्तबद्ध संघ: आकर्षक चषक
याशिवाय प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर (चषक) देण्यात येणार असून स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि नवोदित खेळाडू यांना कुलर, मिक्सर, पंखा, इस्त्री अशी विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत.
ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आई गंगादेवी क्रिकेट संघ मुंबई व ग्रामीण मधील सर्व खेळाडू, कमिटी व्यवस्थापन, गावातील होतकरू युवक तसेच देणगीदार मंडळी अथक परिश्रम घेत आहेत. पुर्ये गावासाठी ही स्पर्धा केवळ क्रिकेट स्पर्धा नसून एक सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

