(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह गुरुवारी (९ एप्रिल) दुपारी भगवती बंदर परिसरातील शिवसृष्टीजवळील टेबल पॉईंटच्या कठड्याखाली आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली. संबंधित तरुणाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अमोल संजय किड्ये (वय ३०, रा. मांडवी-वरचीवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवार, ७ एप्रिल रोजी अमोल किड्ये घरात कोणालाही न सांगता बाहेर पडला होता. त्यानंतर तो परत न आल्याने नातेवाइकांनी त्याचा शोध घेतला. अखेर त्याची आई संगती किड्ये यांनी शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद केली होती. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती.
दरम्यान, गुरुवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना भगवती बंदर येथील टेबल पॉईंटखाली एका तरुणाचा मृतदेह दिसला. याची माहिती तात्काळ शहर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस हवालदार कुशल हातीसकर आणि अमोल भोसले घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह खोल दरीत असल्याने तो बाहेर काढण्यासाठी रत्नदुर्ग माउंटेनिअर्सच्या पथकाची मदत घेण्यात आली.
पथकातील किशोर सावंत, गौतम बाष्टे, शैलेश नार्वेकर, आनंद किर, ओंकार शिवलकर, अक्षय बोरसूडकर, वीरेंद्र वणजू, साई खेऊर आणि तनिष्क सावंत यांनी रॅपलिंगच्या साहाय्याने मृतदेह वर काढला. सायंकाळपर्यंत या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत.

