(रत्नागिरी /प्रतिनिधी)
पावसाळ्यात ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि एस.टी. बससेवा खंडित होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील नादुरुस्त रस्त्यांची सविस्तर माहिती तत्काळ सादर करण्याचे निर्देश विभाग नियंत्रकांना देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बांधकाम समिती सभापती विलास चाळके यांनी दिली.
सुमारे साडेतीन वर्षांनंतर पार पडलेल्या या बैठकीत जिल्ह्यातील विविध बांधकाम कामांचा आढावा घेण्यात आला. विशेषतः ग्रामीण भागातील पावसाळी दिवसांत उद्भवणाऱ्या वाहतूक समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. खराब व दुरवस्थेतील रस्त्यांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प होत असल्याचे निदर्शनास आले. परिणामी ग्रामस्थांना दळणवळणाच्या अडचणींना सामोरे जावे लागते, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सभेत अधोरेखित करण्यात आले.
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे एस.टी. बससेवा अनेक भागांत बंद पडण्याची शक्यता निर्माण होत असल्याने, अशा ठिकाणांची यादी तयार करून तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी
दरम्यान, नादुरुस्त रस्त्यांची यादी प्राप्त झाल्यानंतर अत्यंत खराब अवस्थेतील रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे सभापती चाळके यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील दळणवळण सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

