(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चालू आर्थिक वर्षात तब्बल ३२ कोटी ९ लाखांचा नक्त नफा मिळवत भक्कम आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. आर्थिक शिस्त राखत ग्राहकाभिमुख सेवा देण्यावर भर दिल्यामुळे बँकेची स्थिती सक्षम झाली असून, आज ही बँक महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची जिल्हा बँक म्हणून उदयास आली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बँकेची स्थापना २४ मे १९५७ रोजी झाली. त्यावेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा संयुक्त जिल्हा होता. पुढे १ जुलै १९८३ रोजी विभाजनानंतर रत्नागिरीसाठी स्वतंत्र बँकेची नोंदणी करण्यात आली. सध्या मंडणगड ते राजापूर या ९ तालुक्यांत ७५ शाखा, १ विस्तार कक्ष आणि प्रधान कार्यालय अशा स्वरूपात बँकेचे जाळे विस्तारलेले आहे.
डॉ. चोरगे यांनी २००७ मध्ये सूत्रे हाती घेतली, तेव्हा बँक तोट्यात होती. मोठ्या प्रमाणावर थकीत कर्जे, वाढलेला एनपीए आणि मर्यादित कर्जवाटप यामुळे परिस्थिती गंभीर होती. मात्र, संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने नियोजनबद्ध सुधारणा राबवून बँकेला स्थिर मार्गावर आणण्यात यश आले.
सन २०१२ मध्ये कोअर बँकिंग प्रणाली लागू केल्याने सेवांमध्ये वेग आणि पारदर्शकता वाढली. तसेच ATM, NEFT, RTGS, SMS अलर्ट, POS व्यवहार यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करण्यात आला.
विशेष म्हणजे, सन २०२३-२४ मध्ये सहकारी संस्थांना ३०% लाभांश देणारी ही देशातील पहिली जिल्हा मध्यवर्ती बँक ठरली आहे. बँकेने आजपर्यंत सहकार क्षेत्रातील विविध कामगिरीबद्दल राज्यस्तरीय पुरस्कारांसह एकूण २० पुरस्कार मिळवले आहेत. सलग १५ वर्षे ‘अ’ दर्जाचे ऑडिट, १४ वर्षे नक्त एनपीए शून्य टक्के आणि १८ वर्षे सातत्याने नफा ही बँकेची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी ठरली आहे.
ठळक वैशिष्ट्ये:
- जिल्ह्यात ७६ शाखांचे जाळे, त्यापैकी २६ स्वमालकीच्या इमारती
- १९ ठिकाणी ATM सुविधा आणि मोबाईल ATM व्हॅन सेवा
- UPI, IMPS, QR कोड, मोबाईल बँकिंगसह आधुनिक डिजिटल सेवा
- शेतकरी, उद्योजक आणि आपत्तीग्रस्तांसाठी सवलतीच्या दरात कर्जपुरवठा
- सहकारी संस्थांना आर्थिक मदत, प्रशिक्षण व अभ्यासदौरे
सामाजिक बांधिलकी:
बँकेने शिक्षण आणि ग्रामीण विकासातही पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषद शाळांना १०० संगणक संच देण्यात आले असून, ३० शाळांना सोलार युनिट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शेतकरी मेळावे, क्रीडा स्पर्धा आणि विविध सामाजिक उपक्रमांसाठी आर्थिक सहाय्य दिले जात आहे.
एकंदरीत, अडचणींच्या काळातून सावरत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक स्थैर्य, तांत्रिक प्रगती आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधत राज्यातील आघाडीची बँक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे.

