(रत्नागिरी /प्रतिनिधी)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती रत्नागिरी यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंती महोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
समितीच्या वतीने शनिवार, दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत शासकिय रक्तपेढी, शासकिय रुग्णालय येथे हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. रक्तपेढी ही जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात कार्यरत आहे. ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हा संदेश केंद्रस्थानी ठेवून समाजातील अधिकाधिक रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे, तसेच स्वतःसोबत इतर रक्तदात्यांनाही घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
भीम जयंती महोत्सवाला केवळ उत्सवाचे स्वरूप न देता समाजोपयोगी उपक्रमांद्वारे मानवी संवेदनांचा जागर करण्याचा प्रयत्न समितीकडून सातत्याने केला जात आहे. गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध व्हावा आणि सामाजिक उत्तरदायित्व अधिक दृढ व्हावे, या उद्देशाने या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

