(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील प्राचीन चाफनाथ मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्रशिवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. बुधवार, १५ एप्रिल रोजी हा उत्सव पार पडणार असून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाची सुरुवात सकाळपासून मंत्रजप, पूजा आणि अर्चा अशा धार्मिक विधींनी होणार आहे. पांडवकालीन परंपरेचा वारसा जपणाऱ्या या एकाच दगडात कोरलेल्या मंदिराला यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई आणि सुंदर मंडप सजावटीने उजळवले जाणार आहे.
मंदिर परिसरातील निसर्गसौंदर्य हा उत्सवाचा आणखी एक विशेष आकर्षण ठरतो. नागमोडी वाहणारी नदी, तिचा खळखळणारा आवाज, पक्ष्यांची किलबिल आणि मोरांचे दर्शन यामुळे भाविकांना एक वेगळाच आध्यात्मिक आणि निसर्गरम्य अनुभव मिळतो. उत्सवाच्या दिवशी छबिना, भजन असे कार्यक्रम होणार असून राजू वळामे आणि सहकारी यांचे सुश्राव्य भजन सादर होईल. रात्री १०.३० वाजता हतखंबा जवळील निवळी येथील श्री नवलाई मित्र नमन मंडळ यांचा पारंपरिक नमनाचा कार्यक्रम रंगणार आहे.
गुरुवार, १६ एप्रिल रोजी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन चाळके बंधू आणि चाफवली ग्रामस्थांनी भाविकांना केले आहे.

