(फुणगूस / एजाज पटेल)
शासनाकडून हागणदारीमुक्त घोषित करण्यात आलेल्या फुणगूस गावात अद्यापही सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याची बाब समाजमाध्यमे व स्थानिक वृत्तपत्रांतून समोर आल्यानंतर ग्रामपंचायतीची हालचाल वाढली आहे. या पार्श्वभूमीवर फुणगूस ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी संघटना व रिक्षा संघटनेच्या उपस्थितीत सार्वजनिक शौचालयाच्या संदर्भात शुक्रवारी विशेष सभा आयोजित केल्याचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.
गावातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर तसेच प्रवासी व नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची आवश्यकता गेल्या अनेक वर्षांपासून जाणवत आहे. मात्र प्रत्यक्षात अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आहे.
या गंभीर प्रश्नाकडे समाजमाध्यमे व स्थानिक वृत्तपत्रांनी लक्ष वेधल्यानंतर ग्रामपंचायतीने तातडीने बैठक जाहीर केली असली, तरी बैठकीच्या अजेंड्यात सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाबाबत, त्यासाठीच्या निधीविषयी किंवा अंमलबजावणीसंदर्भात कोणताही स्पष्ट उल्लेख नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सभेत नेमकी कोणती चर्चा होणार आणि ठोस निर्णय घेतला जाणार की नाही, याबाबत ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आहे.
यापूर्वीही सार्वजनिक शौचालयाच्या मागणीसाठी वारंवार आवाज उठवण्यात आला असल्याचे सांगितले जाते. गावाचा हागणदारीमुक्त दर्जा कायम राखण्यासाठी तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने सार्वजनिक शौचालय उभारणे अत्यावश्यक असल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत ग्रामपंचायत प्रशासन या प्रश्नावर ठोस भूमिका मांडते का आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने पावले उचलली जातात का, याकडे फुणगूस ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

