(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील तरवळ-मायंगडेवाडी येथे दिवसाढवळ्या दोन घरांत घुसून रोकड चोरण्याची धाडसी घटना उघडकीस आली असून या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. या घरफोडीत एकूण ३८ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली.
या प्रकरणी आदित्य देवचंद्र कांबळे (वय २६, रा. बालाजी अपार्टमेंट, कारवांचीवाडी फाटा, रत्नागिरी) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. ५) दुपारी साडेतीनच्या सुमारास तरवळ-मायंगडेवाडी येथील विरेश प्रकाश मायंगडे (वय २९) आणि प्रज्योत रविंद्र मायंगडे (वय २३) यांच्या घरांना चोरट्याने लक्ष्य केले. दोघेही फिर्यादी एकाच परिसरात वास्तव्यास आहेत.
संशयिताने प्रथम विरेश मायंगडे यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा धारदार हत्याराने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटातील ड्रॉवरमधून ३३ हजार रुपयांची रोकड काढून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्वेश संदेश मायंगडे यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने धक्काबुक्की करून तेथून पलायन केले. यानंतर त्याने प्रज्योत मायंगडे यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील छोट्या पाकिटात ठेवलेले ५ हजार रुपये चोरून नेले. अशा प्रकारे दोन घरांतील मिळून ३८ हजार रुपयांच्या रोकडीवर डल्ला मारण्यात आला.
या प्रकरणी विरेश मायंगडे व प्रज्योत मायंगडे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

