(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरीतील सराफ बंधूंना कोल्हापूरातील सोने व्यापाऱ्याने तब्बल तीन कोटी रुपयांचा चुना लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. हितेश अशोक जैन आणि अंकित अशोक जैन हे रत्नागिरीतील सुप्रसिद्ध सराफ बंधू असून त्यांच्या मालकीची ‘अर्हम गोल्ड’ आणि ‘ए. झी. गोल्ड’ अशी दोन सुवर्णदुकाने शहरात कार्यरत आहेत. या दुकानांचे व्यवस्थापन राजेंद्र वसंत चव्हाण (४७, रा. झाडगाव नाका, रत्नागिरी) हे पाहतात. मालकांच्या वतीने सोन्याचे व्यवहार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
चव्हाण यांच्या तक्रारीनुसार, कोल्हापूरातील सोने व्यापारी विनायक बंडोपंत पोतदार (रा. कोल्हापूर) याच्याशी गेल्या काही वर्षांपासून जैन बंधूंचे व्यावसायिक संबंध होते. २२ कॅरेट सोने देऊन त्याबदल्यात तेवढ्याच किमतीचे २४ कॅरेट सोने घेण्याचा व्यवहार नियमितपणे होत होता. दीर्घकाळाच्या या व्यवहारातून दोघांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले होते. मात्र, १८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२५ रोजी एकूण चार किलो (सुमारे तीन कोटी रुपये किंमतीचे) २२ कॅरेट सोने पोतदार याला देण्यात आले. त्याबदल्यात २४ कॅरेट सोने परत मिळणे अपेक्षित होते, परंतु महिनोनमहिने उलटले तरी पोतदारने सोने परत केले नाही. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर त्याने पैसे देण्याचे आश्वासन दिले.
यानुसार, पोतदारने १९ मे २०२५ रोजी दोन धनादेश दिले. अर्हम गोल्डच्या नावे एक कोटी ५० लाख २८ हजार ३०७ रुपयांचा आणि दुसरा ए. झी. गोल्डच्या नावे एक कोटी ५२ लाख ३८ हजार ६२३ रुपयांचा असे दोन धनादेश देण्यात आले. मात्र हे दोन्ही धनादेश बँकेत सादर केल्यावर बाऊंस झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोतदारने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे विश्वासघात आणि फसवणुकीचा आरोप करत राजेंद्र चव्हाण यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विनायक पोतदार याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

