(रत्नागिरी)
शहरालगतच्या मिरकरवाडा बाजारपेठ परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या एका अनोळखी पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली असून संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अनोळखी पुरुषाचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असून तो सोमवारी सकाळी मिरकरवाडा बाजारपेठ परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. नागरिकांच्या निदर्शनास ही बाब येताच त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात सकाळी सुमारे सव्वासातच्या दरम्यान वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला मृत घोषित केले. या घटनेची माहिती डॉ. शुभम वाघधरे यांनी पत्राद्वारे पोलिसांना दिली.
दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून त्याबाबत कोणाला माहिती असल्यास शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. पुढील तपास सुरू आहे.

