(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील खेडशी येथील एकतानगर परिसरातून २० वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिसरात शोध घेऊनही मुलाचा ठावठिकाणा न लागल्याने त्याचे अपहरण झाल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे. या तक्रारीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहिल संतोष गुरव (वय २०, रा. एकतानगर, महालक्ष्मी मंदिराजवळ, खेडशी, ता. जि. रत्नागिरी) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील संतोष बाळकृष्ण गुरव (वय ४५, व्यवसाय वाहनचालक) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास साहिल हा खेडशी येथील राहत्या घरातून कुठेतरी निघून गेला. त्यानंतर वडिलांनी आजूबाजूच्या परिसरात, नातेवाईकांकडे तसेच मित्रमंडळींकडे त्याचा शोध घेतला. मात्र, सर्वत्र चौकशी करूनही साहिलचा शोध लागला नाही. त्यामुळे त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण करून नेले असावे, असा संशय वडिलांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याच्या दृष्टीने पोलीस पुढील तपास करीत आहेत.


