पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली मंगळवारची अंतिम मुदत वाढवली जाणार नसल्याचे स्पष्ट करत कठोर इशारा दिला आहे. “होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही, तर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर आणि पायाभूत सुविधांवर हल्ले केले जातील,” असे त्यांनी सांगितले.
जागतिक तेल आणि गॅस वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी होर्मुझ सामुद्रधुनी ही सामुद्रधुनी खुली करण्याचा मुद्दा या संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला आहे. अमेरिकेने या मार्गावर दबाव वाढवला असताना, इराणने मात्र स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. दरम्यान, भारतासाठी महत्त्वाची बाब म्हणजे एलपीजी घेऊन येणारी ‘ग्रीन आशा’ ही जहाज होर्मुझ सामुद्रधुनी मार्गे पुढे सरकली आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षानंतर या मार्गे भारतात येणारे हे आठवे जहाज ठरले आहे.
युद्धविराम प्रस्ताव फेटाळला
इराणने ४५ दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविरामाचा प्रस्तावही नाकारला आहे. “पुन्हा आमच्यावर हल्ला होणार नाही, याची हमी मिळाल्याशिवाय कोणताही करार मान्य नाही,” असे इराणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच, होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासही त्यांनी नकार दिला आहे. या प्रस्तावासाठी पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की या देशांनी मध्यस्थी केली होती. मात्र, इराणने थेट अमेरिकेशी चर्चा करण्यासही नकार दिला आहे.
‘एका रात्रीत इराण उद्ध्वस्त करू’ – ट्रम्प
इराणच्या भूमिकेनंतर ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेत “अमेरिका एका रात्रीत इराणला उद्ध्वस्त करू शकते,” अशी थेट धमकी दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमेरिका-इस्रायलने इराणमधील काही महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केल्याचे वृत्त असून, ‘साऊथ पार्स’ गॅस क्षेत्रालाही लक्ष्य करण्यात आल्याचे समजते. या हल्ल्यांत अनेकांचा मृत्यू झाला आहे. प्रत्युत्तरादाखल इराणने इस्रायलसह काही अरब देशांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. दोन्ही बाजूंनी माघार घेण्याची चिन्हे सध्या दिसत नसल्यामुळे हा संघर्ष दीर्घकाळ चालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंडरसी केबल्स टार्गेट? जगभर इंटरनेट ब्लॅकआउटचा धोका
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता केवळ लष्करी पातळीवर न राहता डिजिटल क्षेत्रातही वाढताना दिसत आहे. लष्करी हल्ले थांबले नाहीत, तर “जगाला अंधारात ढकलू” असा इशारा इराणमधील काही लष्करी गटांनी दिल्यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणकडून समुद्राखालील (Undersea) इंटरनेट केबल्स लक्ष्य करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या केबल्स आशिया, युरोप आणि मध्यपूर्वेला जोडतात आणि त्यांचा मोठा भाग होर्मुझची सामुद्रधुनी या अरुंद सागरी मार्गातून जातो. तज्ञांच्या मते, या केबल्सना नुकसान झाल्यास अनेक देशांमध्ये इंटरनेट सेवा विस्कळीत होऊ शकतात, ज्यामुळे जागतिक डिजिटल नेटवर्कवर मोठा परिणाम होऊ शकतो.
जगाचा 95% इंटरनेट डेटा केबल्सवर अवलंबून
जगभरातील ९५% पेक्षा जास्त इंटरनेट डेटा हा उपग्रहांऐवजी फायबर ऑप्टिक अंडरसी केबल्सद्वारे ट्रान्सफर होतो. लाल समुद्र आणि होर्मुझ परिसर हे या केबल्सचे महत्त्वाचे केंद्र मानले जातात.
या केबल्स बंद पडल्यास:
- आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि ATM सेवा ठप्प होऊ शकतात
- शेअर बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यता
- व्हॉट्सअॅप, गुगल, फेसबुक यांसारख्या सेवा बंद पडू शकतात
इराणची दबाव तंत्रनीती?
होर्मुझ मार्गावर आधीच तणाव असताना, इंटरनेट केबल्सवर हल्ल्याची धमकी देणे हे इराणचे दबाव वाढवण्याचे धोरण मानले जात आहे. “लष्करी कारवाई थांबवा, अन्यथा जागतिक पातळीवर परिणाम भोगावे लागतील,” असा अप्रत्यक्ष संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
भारतावर मोठा परिणाम होण्याची शक्यता
भारताचा मोठा इंटरनेट ट्रॅफिक मुंबई आणि चेन्नई येथील केबल लँडिंग स्टेशनद्वारे या आंतरराष्ट्रीय नेटवर्कशी जोडलेला आहे. जर या अंडरसी केबल्सना हानी पोहोचली, तर IT आणि BPO क्षेत्रावर मोठा परिणाम होईल. तसेच Work From Home प्रणाली विस्कळीत होऊ शकते आणि डिजिटल पेमेंट सेवा प्रभावित होऊ शकतात. यामुळे हा संघर्ष केवळ युद्धापुरता मर्यादित न राहता जागतिक अर्थव्यवस्था आणि दैनंदिन जीवनावरही परिणाम करू शकतो.

