(महाड)
जिल्ह्यातील महाड शहरात गुरु-शिष्य नात्याला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. खाजगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकाविरोधात अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 2024-25 या शैक्षणिक वर्षात घडली. पीडित मुलगा इयत्ता दहावीचा विद्यार्थी असून तो महाडमधील नामांकित ‘गांधी क्लास’ येथे शिकवणीसाठी जात होता. तक्रारीनुसार, संबंधित शिक्षकाने शिकवणीच्या निमित्ताने विद्यार्थ्याला क्लासमधील वरच्या मजल्यावरील खोलीत नेले आणि त्याच्याशी अयोग्य वर्तन करत लैंगिक अत्याचार केला.
या घटनेनंतर विद्यार्थी भीतीमुळे काही दिवस गप्प राहिला. मात्र मानसिक तणाव वाढल्यानंतर त्याने धाडस करून संपूर्ण प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. ही माहिती मिळताच कुटुंबीय हादरले आणि त्यांनी तत्काळ महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शिक्षकाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (POCSO) कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू असून तपास जलद गतीने सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षकांसारख्या जबाबदार व्यक्तीकडून अशा प्रकारचे कृत्य होणे अत्यंत गंभीर मानले जात आहे. स्थानिक नागरिक आणि पालकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी खाजगी शिकवणी वर्गांवर अधिक कडक देखरेख ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

