( मुंबई )
डिजिटल अटकेची भीती दाखवून एका निवृत्त बँक अधिकाऱ्याची तब्बल 1 कोटी 83 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पूर्व सायबर सेलने अज्ञात सायबर ठगांविरोधात फसवणूक, तोतयागिरी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार हे मुलुंड परिसरात राहणारे असून, एका नामांकित बँकेतून निवृत्त झाले आहेत. जानेवारी 2026 मध्ये त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. कॉल करणाऱ्याने आपण दूरसंचार विभागातून बोलत असल्याचे सांगत तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल असल्याचा दावा केला. काही वेळातच दुसऱ्या व्यक्तीने फोन करून स्वतःला गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे सांगत चौकशी सुरू केली.
व्हिडिओ कॉलद्वारे झालेल्या या तथाकथित चौकशीत तक्रारदाराला विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यांच्या बँक खात्यांची माहिती, एफडी, इतर गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारांबाबत सविस्तर माहिती घेतली गेली. भीतीचे वातावरण निर्माण करत आरोपींनी, “तुमच्याविरुद्ध घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. सध्या तुम्ही डिजिटल अटकेत आहात,” असे सांगितले.
अटक टाळण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराला एफडी मोडण्यास, बँक खात्यातील रक्कम काढण्यास तसेच दागिने विकून पैसे पाठवण्यास भाग पाडले. जानेवारी ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने आरोपींनी दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये एकूण 1 कोटी 83 लाख रुपये जमा केले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रक्कम परत मिळेल, असे आमिषही आरोपींनी दाखवले होते.
मात्र, रक्कम पाठवल्यानंतर कोणतीही चौकशी झाली नाही, तसेच पैसेही परत मिळाले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने पूर्व सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगांविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सायबर पोलिसांचा इशारा
कोणतीही सरकारी यंत्रणा ‘डिजिटल अटक’ अशी संकल्पना वापरत नाही. अशा प्रकारचे फोन, व्हिडिओ कॉल किंवा आर्थिक माहिती मागणारे संदेश मिळाल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

