( रत्नागिरी )
खेड तालुक्यात एप्रिल २०२६ दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरांचे’ आयोजन करण्यात आले असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी केले आहे.
या अंतर्गत दि. १० एप्रिल रोजी कुळवंडी हायस्कूल, दि. १७ एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दस्तुरी, दि. २४ एप्रिल रोजी धावजी बुवा मंदिर, कोरेगाव तसेच दि. ३० एप्रिल रोजी श्रीदेवी काळकाई मंदिर सभागृह, भरणे येथे शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महसूल विभागाच्या वतीने मंडळ स्तरावर आयोजित या शिबिरांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांच्या महसूल विषयक दैनंदिन अडचणी, तक्रारी व प्रलंबित प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यात येणार आहे. तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्यातील प्रत्येक तालुक्यात अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
या शिबिरांमुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची गरज कमी होऊन त्यांच्या समस्या थेट ठिकाणी सोडवण्यास मदत होणार आहे.

