( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्ह्यात पाली भाषेच्या अध्ययन-प्रसारासाठी मोलाचे योगदान देणारे प्राध्यापक दिलीप वामनराव वासनिक यांचा विद्यार्थ्यांच्या वतीने कृतज्ञता सन्मान सोहळा सोमवारी (दिनांक ६ एप्रिल २०२६) गयाळवाडी येथील विपश्यना केंद्र येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
सिद्धार्थ महाविद्यालय अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या डिप्लोमा इन पाली प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्ध यांनी पाली भाषेत दिलेल्या उपदेशांचा अभ्यास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य प्रा. वासनिक यांनी सातत्याने केले आहे. या शैक्षणिक योगदानाबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत विशेष सन्मान आयोजित केला.
कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर पुज्य सुगतपाल महाथेरो यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील देऊन कार्यक्रमाला आध्यात्मिक अधिष्ठान दिले. प्रा. वासनिक यांच्यासह त्यांच्या पत्नी दीपिका वासनिक यांचाही पंचशील दुपट्टा, शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित अलंकारिक कृतज्ञता लेखन असलेली विशेष फोटोफ्रेम तसेच पाली भाषेत तयार केलेले लेखनपत्र भेट देत सन्मान अधिक अर्थपूर्ण केला.
या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी विजय जाधव, अनामिका जाधव, संघमित्रा कुरतडकर, संजय आयरे, एन. बी. कदम, प्रदीप जाधव आणि जयेश जाधव यांनी मनोगतातून प्रा. वासनिक यांनी दिलेल्या प्रशिक्षणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी धम्मदेशन करताना भन्ते सुगतपाल महाथेरो यांनी ज्ञान, शिस्त आणि साधनेचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच मार्गदर्शन करताना प्रा. वासनिक यांनी पाली भाषेचे शिक्षण केवळ वैयक्तिक प्रगतीपुरते मर्यादित न ठेवता समाजहितासाठी उपयोगात आणण्याचे आवाहन केले. सम्राट अशोक यांनी लेण्या, स्तंभ आणि स्तूपांवर कोरलेल्या पाली शिलालेखांचे संशोधन, जतन आणि प्रसार करण्यासाठी नव्या पिढीने पुढे यावे, असा संदेश त्यांनी दिला. यावेळी शरणत्तेय घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

