(चिपळूण)
लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता आज अधिक वाढली. गेल्या तब्बल ७५ दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण नागरी संघर्ष समिती आणि लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती यांच्या वतीने कंपनीविरोधात धडक मोर्चा काढण्यात आला.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत असलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या प्रस्तावित PFAS (घातक रसायन) उत्पादनाविरोधात आज नागरिकांनी मोठा मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला. “पर्यावरण व मानवी आरोग्यासाठी धोकादायक प्रकल्प तात्काळ बंद करा” अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. पोलिस प्रशासनाने कंपनीपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर मोर्चास परवानगी दिली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या मोर्चात लोटे पंचक्रोशीसह चिपळूण व खेड तालुक्यातील ग्रामस्थ, महिला, युवक तसेच माजी सैनिक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाची सुरुवात मुंबई-गोवा महामार्गावरील एक्सेल फाटा येथून झाली. सकाळी १० वाजल्यापासून आंदोलक मोठ्या संख्येने जमा होऊ लागले होते. दरम्यान आंदोलकांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
यावेळी आंदोलकांनी स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यावरही जोरदार टीका करत “जनतेच्या आरोग्याशी खेळ करणारे प्रकल्प सहन केले जाणार नाहीत” असा इशारा दिला.
PFAS सारख्या घातक रसायनांच्या उत्पादनामुळे पर्यावरण प्रदूषण वाढण्याची तसेच नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे अशा प्रकल्पांवर तात्काळ बंदी घालावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलनकर्त्यांनी कंपनीविरोधातील नाराजी तीव्र शब्दांत व्यक्त करत स्थानिक प्रशासन आणि शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अशोक जाधव आणि राजेंद्र आंब्रे हे गेल्या ७५ दिवसांपासून कंपनीविरोधात उपोषण करत असतानाही प्रशासनाने याची पुरेशी दखल घेतलेली नाही. PFAS (घातक रसायन) उत्पादन करणाऱ्या या कंपनीकडून आंदोलकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला.
आंदोलनकर्त्यांच्या मते, कंपनीकडून घातक रसायनांची सुरक्षित विल्हेवाट लावली जात असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. कंपनीचे सांडपाणी टँकरद्वारे सीईटीपीकडे पाठवले जात असले तरी जबबुडी नदी परिसरात कंपनीच्या टँकरचा झालेला अपघात गंभीर प्रश्न निर्माण करणारा ठरल्याचा दावा आंदोलकांनी केला.
“मानवी आरोग्यासाठी घातक ठरणारी ही कंपनी कोकणातून हद्दपार करावी,” अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली. स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित मुद्द्यावर राजकीय नेते मौन बाळगत असल्याचा आरोपही करण्यात आला. PFAS संदर्भात देशात ठोस कायदे नसल्याचा फायदा घेत कंपनीला काही अटींसह मान्यता देण्यात आल्याचा दावा करत, या संदर्भात कडक कायदे करावेत व कंपनी तातडीने बंद करावी, अशी मागणी करण्यात आली.
या वेळी समितीचे उदय घाग, अशोक जाधव, राजेंद्र आंब्रे, मनसेचे पदाधिकारी, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग तसेच आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी आपली मते मांडली. मोर्चानंतर समितीच्या वतीने जिल्हा प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातील मुद्द्यांवर २० दिवसांत लेखी उत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली. मोर्चा शांततेत पार पडला असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.
दरम्यान, “जोपर्यंत हा प्रकल्प बंद होत नाही, तोपर्यंत आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
कंपनीची भूमिका
दरम्यान, लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचे उत्पादन विभागाचे उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना समजून घेत असल्याचे सांगितले. उपस्थित केलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे लवकरच दिली जातील. यापूर्वी दिलेल्या निवेदनांनाही आम्ही प्रतिसाद दिला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, “PFAS घटकाचे उत्पादन केवळ येथेच होत नाही, तर भारतात सुमारे ५५ हजार मेट्रिक टन उत्पादन होते. दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंमध्ये या घटकाचा वापर होतो. याबाबत काही गैरसमज असून ते दूर करण्यासाठी कंपनीकडून जनजागृती करण्यात येत आहे.”

