(खेड)
राजमाता महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वाजलेसवाडी (सांगली) येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या संगीत वाद्य वादन स्पर्धेत नांदिवली दंडवाडी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक समिती शाखा खेडचे प्रवक्ते दिलीप यादव यांनी पाचवा क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत दिलीप यादव यांनी सादर केलेल्या सुरेल पेटी वादनाने उपस्थित प्रेक्षकांसह स्पर्धकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या सादरीकरणाला परीक्षकांकडूनही विशेष दाद मिळाली. तबल्याची साथ शिक्षक समितीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीकृष्ण खांडेकर यांनी दिली, तर टाळ वादन राजेश गुरवले यांनी केले.
यापूर्वी खेड येथे झालेल्या तालुकास्तरीय संगीत वाद्य वादन स्पर्धेतही दिलीप यादव यांनी उत्कृष्ट पेटी वादन करत प्रथम क्रमांक मिळवला होता. विभागीय स्पर्धेतील या यशामुळे त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यामुळे खेड तालुक्यातील शिक्षकांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशाबद्दल खेडचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक आणि गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांनी दिलीप यादव यांचे अभिनंदन केले आहे.

