(रत्नागिरी / प्रतिनिधी)
प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या नावाने जाहीर करण्यात आलेल्या ‘स्वरसंध्या’ या सांस्कृतिक कार्यक्रमाभोवती निर्माण झालेला गोंधळ रविवारी उघडकीस आला. शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे सायंकाळी सात वाजता होणारा कार्यक्रम प्रत्यक्षात आयोजितच न झाल्याने राज्यातील विविध भागांतून आलेल्या शेकडो रसिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असून, फसवणुकीचा आरोप आयोजकांवर करण्यात येत आहे.
हा कार्यक्रम एकदंत थिएटर्स आणि ताल क्रिएशन्स (ताल एंटरटेनमेंट) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. स्थानिक स्तरावर तसेच बुक माय शो या ऑनलाइन तिकीट विक्री मंचावरून तिकिटांची विक्री सुरू होती. पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली आदी शहरांतील रसिकांनी ५०० रुपयांपासून ३५०० रुपयांपर्यंतची तिकिटे खरेदी केली होती. सुमारे १५०० प्रेक्षक क्षमतेचा हा कार्यक्रम असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, कार्यक्रमाच्या वेळेस क्रीडांगणावर पोहोचलेल्या प्रेक्षकांना धक्काच बसला. सदर ठिकाणी स्टेजची उभारणी नव्हती, आसनव्यवस्था नव्हती, ध्वनीप्रणाली वा प्रकाशयोजनेची कोणतीही तयारी दिसत नव्हती. आयोजकांकडूनही स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने प्रेक्षकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले. आयोजक गंधार जोग आणि दिवेश बापट यांनी कार्यक्रम पाच दिवसांपूर्वीच रद्द केल्याची माहिती संबंधित ऑनलाइन तिकीट प्लॅटफॉर्मला देण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र, कार्यक्रमाच्या दिवशीही तिकीट विक्री सुरू असल्याचे समोर आल्याने जबाबदारी नेमकी कोणाची, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
कोल्हापूरहून आलेल्या वैशाली कोळी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “कार्यक्रमासाठी खास वाहन करून आलो, हॉटेलची व्यवस्था केली, ३५०० रुपयांचे तिकीट घेतले; मात्र येथे आल्यावर कार्यक्रमच नसल्याचे समजले. आयोजकांकडून कोणतीही सूचना मिळाली नाही. ही स्पष्ट फसवणूक असून जबाबदारांवर कारवाई व्हावी.”
मुंबई, पुणे आणि इतर शहरांतून आलेल्या अनेक रसिकांनीही अशाच भावना व्यक्त केल्या. “महेश काळे यांच्यासारख्या मान्यवर कलाकाराच्या कार्यक्रमाबाबत असा निष्काळजीपणा अत्यंत दुर्दैवी आहे,” अशी प्रतिक्रिया अमृता काळे यांनी दिली. स्थानिक नागरिकांच्या मते, मोठ्या कार्यक्रमासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारीच नसल्याने संशय अधिकच गडद झाला. स्टेज, रोषणाई, सुरक्षा व्यवस्था किंवा पोलीस बंदोबस्त यांपैकी कोणतीही हालचाल परिसरात दिसत नव्हती.
दरम्यान, संतप्त प्रेक्षकांनी शहर पोलीस ठाण्यात लेखी अर्ज सादर करून आयोजकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तिकीटाचे पैसे तसेच प्रवास व निवासाचा खर्च परत मिळावा, अशी मागणीही जोर धरत आहे. या घटनेमुळे रत्नागिरीतील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या व्यवस्थापनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर यंत्रणा उभारण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

