(नवी मुंबई)
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना 42 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ने मंगळवारी रंगेहात अटक केली. नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील त्यांच्या केबिनमध्येच ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदार दशरथ सुरवसे यांनी अतिक्रमण हटविण्याची कामे केली होती. ऐरोली विभागात 15 नोव्हेंबर 2024 ते 15 फेब्रुवारी 2025 या कालावधीत करण्यात आलेल्या कामांचे बिल महापालिकेत प्रलंबित होते. हे बिल मंजूर करून देण्यासाठी आणि फाईलवर सही करण्यासाठी डॉ. कैलास गायकवाड यांनी 42 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
याप्रकरणी त्रस्त झालेल्या दशरथ सुरवसे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कडे तक्रार दाखल केली. प्राथमिक पडताळणीनंतर नवी मुंबई विभागाचे पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला. नियोजनानुसार, गायकवाड यांनी लाच स्वीकारताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले. तक्रारदाराच्या माहितीनुसार, एकूण सुमारे दीड कोटी रुपयांचे बिल थकीत होते. त्यापैकी 21 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी 2 टक्के रक्कम लाच स्वरूपात मागण्यात आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिका चा अतिक्रमण विभाग यापूर्वीही विविध घोटाळ्यांमुळे चर्चेत राहिला आहे. अशा परिस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यालाच लाच घेताना पकडल्यामुळे पालिकेतील भ्रष्टाचारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, डॉ. कैलास गायकवाड हे केवळ अधिकारीच नव्हते, तर गझलकार आणि साहित्यिक म्हणूनही ओळखले जात होते. त्यामुळे त्यांच्या अटकेमुळे साहित्य क्षेत्रातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कडून सुरू असून, या व्यवहारात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. तसेच महापालिका प्रशासनाकडूनही स्वतंत्र चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

