(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यामधील चिपळूण तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज येथे प्रस्तावित पीएफएएस (PFAS) रसायन उत्पादन प्रकल्पाविरोधात आज, सोमवार ६ एप्रिल रोजी स्थानिक नागरिकांचा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. “पर्यावरण व आरोग्य वाचवा, पीएफएएस हटवा” या घोषणेखाली कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती आणि जनआक्रोश समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन उभारण्यात आले आहे.
आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, पीएफएएससारख्या दीर्घकालीन दुष्परिणाम करणाऱ्या रसायनांच्या उत्पादनामुळे परिसरातील पाणी, माती, हवा आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तावित प्रकल्पास तातडीने विरोध नोंदवत स्थानिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोर्चामागील प्रमुख मागण्यांमध्ये पीएफएएससारख्या घातक रसायनांचे उत्पादन तात्काळ थांबविणे, संभाव्य प्रदूषणासंदर्भात सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करणे, दूषित पाणी व मातीच्या नमुन्यांवर स्वतंत्र वैज्ञानिक अहवाल जाहीर करणे, तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्यसुरक्षेबाबत स्पष्ट हमी देणे यांचा समावेश आहे. याशिवाय, कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी स्थानिकांची मते जाणून घेण्यासाठी तात्काळ जनसुनावणी घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.
हा मोर्चा सकाळी १०.३० वाजता परशुराम एनर्जीएक्सेल फाटा येथून प्रारंभ होऊन लोटे एमआयडीसी परिसरातील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीपर्यंत जाणार आहे. ग्रामस्थ, महिला, शेतकरी, मच्छीमार, कामगार, विद्यार्थी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. “लक्ष्मी कंपनी हटवा , कोकण वाचवा” या घोषणांनी परिसरात आंदोलनाचे वातावरण तापले असून, स्थानिक पातळीवर या मोर्चाला व्यापक लोकसमर्थन मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रशासनानेही या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.
या आंदोलनाचे प्रमुख संयोजक म्हणून अशोकराव जाधव, राजेंद्र आंब्रे, सचिन चाळके, अविनाश आंब्रे, रविंद्र गोळवणकर आणि दिलीप घाग यांनी पुढाकार घेतला असून, पर्यावरणीय प्रश्नावर स्थानिक जनतेची एकजूट पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

