(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कृत्रिम बुद्धिमत्ता एआय आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने तब्बल चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) ही कारवाई करत तपासात तंत्रज्ञानाच्या वापराचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 196/2022 (भा.द.वि. कलम 381, 379, 34) मधील आरोपी बुधाराम रामलाल (वय 42, मूळ रा. जोधपूर, राजस्थान) हा गेल्या चार वर्षांपासून फरार होता. मात्र, ‘रेड्स ॲप’च्या मदतीने त्याचा मागोवा घेण्यात पोलिसांना यश आले. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने 15 डिसेंबर 2025 रोजी विकसित केलेले रेड्स ॲप’ हे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ॲप असून, गुन्हे अन्वेषणात आधुनिक तांत्रिक सहाय्य देण्यासाठी विशेषतः तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून फरार आरोपी किंवा हरवलेल्या व्यक्तींचे फोटो तब्बल 108 विविध तांत्रिक पद्धतींनी पुनर्निर्मित (reconstruct) करता येतात. त्यामुळे संशयितांची ओळख पटवणे, त्यांच्या हालचालींवर नजर ठेवणे आणि तपासाची गती वाढवणे अधिक सुलभ झाले आहे.
तपासादरम्यान आरोपी गुजरातमधील मुंद्रा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे शोधमोहीम राबवली. मात्र, पुढील गुप्त आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी मुंबईत आल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत 15 एप्रिल 2026 रोजी पनवेल येथील कळंबोली सर्कल परिसरातून आरोपीला अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली स.पो.फो. बाळू जाधवर, पो.हवा. विनायक राजवैद्य, बाळू पालकर आणि रामीज शेख यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. दरम्यान, ‘रेड्स ॲप’च्या यशस्वी वापरामुळे रत्नागिरी पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम तपास यंत्रणा उभारल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, भविष्यात गुन्हे अन्वेषण अधिक वेगवान आणि अचूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

