(नाशिक)
राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या अशोक खरात प्रकरणात नवनवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. आरोपीने अनेक महिलांसोबत संबंध ठेवल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणातील 15 ते 20 महिला सध्या मानसिक तणावाखाली असून त्या मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओंमुळे संबंधित महिलांना सामाजिक बदनामीचा मोठा फटका बसला असून अनेक जणी एकटेपणा आणि भीतीच्या छायेत जगत आहेत. या पार्श्वभूमीवर तपासासाठी नेमलेल्या विशेष पथकाने महिलांना कोणतेही दडपण येणार नाही आणि त्यांची संपूर्ण सुरक्षा केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे.
या संवेदनशील प्रकरणात महिलांची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. चौकशी अज्ञातस्थळी केली जात असून कोणतीही माहिती बाहेर लीक होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. या प्रकरणातील आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. सायबर पोलिसांकडून संबंधित अकाउंट्सवर लक्ष ठेवले जात असून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पत्नीवर लुकआऊट नोटीस, मुलगाही फरार
दरम्यान, तपासादरम्यान आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून ती फरार आहे. याचबरोबर, काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला त्याचा मुलगाही सध्या संपर्काबाहेर आहे. त्याचा मोबाईल बंद असल्याने तोही फरार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. समाजातही या प्रकरणामुळे मोठी चर्चा सुरू झाली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

