(कोल्हापूर)
हातकणंगले तालुक्यातील टोप परिसरात सोमवारी रात्री घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. संभापूर गावच्या हद्दीतील बिरदेव मंदिरामागील शेतात कामगारांसाठी उभारलेल्या खोल्यांमध्ये किरकोळ वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगल विभीषण मांझी (वय 35, मूळ ओडिसा) या गवंडी मजुराचा चाकूने भोसकून खून झाला असून, मेंढरावणी करण्यास गेलेल्या त्याच्या सहकारी संजय निहाल यालाही गंभीर जखम झाली आहे. घटनेनंतर काही तासांतच शिरोली एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी देवश्री प्रफुल्ल चंदन (वय 25) याला अटक केली आहे.
मंगल मांझी हे ओडिसा राज्यातील रहिवासी असून काही वर्षांपासून संभापूर येथील बिरदेव मंदिराच्या पिछाडीस असलेल्या शेतातील भाड्याच्या खोल्यांत राहत होते. बांधकाम क्षेत्रात काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सोमवारी दुपारी आरोपी देवश्री चंदन हाही त्यांच्याच खोलीत राहण्यासाठी आला होता. यापूर्वी तो गंधर्व फाटा परिसरात राहत होता; परंतु सतत वाद घालत असल्याने त्याला तेथून बाहेर काढण्यात आले होते.
नेमकं घडलं काय?
सोमवारी रात्री कामगार एकत्रितपणे जेवणाची तयारी करत होते. मद्यपानाच्या सत्रादरम्यान भाजी चिरण्याच्या किरकोळ कारणावरून मंगल आणि देवश्री यांच्यात वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक स्वरूपात असलेला वाद काही क्षणांतच मोठ्या बाचाबाचीमध्ये बदलला. अचानक संतापलेल्या देवश्रीने जवळचा चाकू उचलून मंगलवर हल्ला चढवला. धोका ओळखून मंगलने घराबाहेर पळ काढला; मात्र संतापाच्या भरात देवश्रीने त्याचा पाठलाग करत त्याच्या पोटात खोलवर वार केला. गंभीर जखमी झालेला मंगल क्षणात जमिनीवर कोसळला.
आरडाओरडा ऐकून संजय निहाल यांच्यासह इतर मजूर बाहेर आले. संजय यांनी देवश्रीला थांबवण्याचा प्रयत्न केला; परंतु देवश्रीने त्यांच्याही हातावर चाकूने वार केला. दोघांनाही तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मंगल मांझीचा मृत्यू झाला, तर संजयवर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपी देवश्री चंदन हा अत्यंत मद्यधुंद अवस्थेत सापडला आणि त्याला तात्काळ अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

