( मुंबई / वृत्तसंस्था )
राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेच्या पहिल्या लाभार्थी यादीची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. राज्यातील १ लाख ६९ हजार ८२० शेतकऱ्यांचा या यादीत समावेश असून, पात्र लाभार्थ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार आहे. या लाभासाठी शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शेवटच्या पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्तीचा लाभ मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.
योजनेच्या पहिल्या यादीतील लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी असणेही बंधनकारक आहे. या दोन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा केली जाणार आहे.
राज्य शासनाने २ जून २०२६ रोजी या योजनेचा शासन निर्णय जारी केला होता. कर्जमाफी, एकवेळ समझोता (ओटीएस) आणि प्रोत्साहनपर लाभ अशा तीन घटकांचा यामध्ये समावेश आहे. यापूर्वी कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात २५ लाख ८१ शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या २० लाख ७२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आतापर्यंत १८ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे. आता योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ओटीएसची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
ओटीएस योजनेनुसार दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांवरील उर्वरित रक्कम स्वतः भरावी लागणार आहे. ही रक्कम संबंधित बँकेत ३१ मार्च २०२७ पर्यंत जमा करणे आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांना त्यापैकी कोणत्याही एका कर्जखात्यात ही रक्कम भरण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, ओटीएसअंतर्गत निश्चित केलेल्या रकमेपेक्षा अधिक पैसे जमा करू नयेत, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
पहिल्या यादीतील लाभार्थ्यांची नावे संबंधित बँकांच्या शाखांमध्ये, विकास संस्थांच्या कार्यालयांमध्ये तसेच ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शासनाकडून मंजूर करण्यात आलेली दोन लाख रुपयांपर्यंतची मदत संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा झाल्यानंतर कर्जमुक्तीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
विभागनिहाय लाभार्थ्यांचा विचार करता नाशिक विभागात सर्वाधिक ४८ हजार ३७९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पुणे विभागातील ४० हजार ९४६, छत्रपती संभाजीनगर विभागातील ३९ हजार ५९७, अमरावती विभागातील २५ हजार ९१७, नागपूर विभागातील १२ हजार २ आणि कोकण विभागातील २ हजार ९७९ शेतकरी या योजनेच्या पहिल्या यादीत पात्र ठरले आहेत.
या योजनेबाबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, ओटीएस योजनेअंतर्गत आज १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. शेवटच्या पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्तीचा लाभ मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहील. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कायमचे हलके करणे हे आमचे प्राधान्य असून, त्यांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.


