(नवी दिल्ली)
1 एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात देशभरात महत्त्वाचे आर्थिक बदल लागू होणार आहेत. Income Tax Department च्या नव्या तरतुदीनुसार PAN कार्डशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले असून, याचा थेट परिणाम मालमत्ता, वाहन खरेदी, बँकिंग व्यवहार आणि विमा क्षेत्रावर होणार आहे. या बदलांचा मुख्य उद्देश छोट्या व्यवहारांना सुलभ करणे आणि मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढवणे हा आहे. त्यामुळे नागरिकांनी गुंतवणूक, खरेदी किंवा आर्थिक नियोजन करण्यापूर्वी नव्या नियमांची माहिती असणे आवश्यक ठरणार आहे.
मालमत्ता व्यवहारात मोठा दिलासा
आधी 10 लाख रुपयांपर्यंतच्या मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी PAN कार्ड आवश्यक होते. आता ही मर्यादा वाढवून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे लहान शहरांतील मालमत्ता व्यवहार अधिक सुलभ होणार आहेत.
वाहन खरेदीचे नियम सुलभ
नवीन नियमानुसार, 5 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या वाहनांसाठीच PAN कार्ड अनिवार्य असेल. यापूर्वी सर्व चारचाकी वाहनांसाठी PAN आवश्यक होते. त्यामुळे स्वस्त वाहन किंवा दुचाकी खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
PAN कार्डसाठी नवे नियम
1 एप्रिलपासून नवीन PAN कार्ड बनवताना आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. त्याऐवजी जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट किंवा दहावीचे गुणपत्रक सादर करावे लागेल.
तसेच PAN आणि आधारवरील नाव एकसारखे असणे बंधनकारक करण्यात आले आहे. नावात फरक असल्यास आर्थिक व्यवहारांमध्ये अडथळे येऊ शकतात.
हॉटेल बिल पेमेंट मर्यादा वाढली
हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख बिल भरताना PAN कार्ड आवश्यक असेल. यापूर्वी ही मर्यादा 50 हजार रुपये होती. लग्न व मोठ्या कार्यक्रमांसाठी हा बदल फायदेशीर ठरणार आहे.
बँक व्यवहारांसाठी वार्षिक मर्यादा
आता दैनंदिन रोख व्यवहाराऐवजी वार्षिक नियम लागू करण्यात आला आहे. एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा किंवा काढण्यासाठी PAN कार्ड अनिवार्य असेल. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना अधिक लवचिकता मिळणार आहे.
विमा पॉलिसीवरही नवीन नियम
कोणतीही नवी विमा पॉलिसी खरेदी करताना PAN कार्ड देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक पॉलिसी PAN शी लिंक करावी लागणार असून, यामुळे विमा क्षेत्रात पारदर्शकता वाढणार आहे.
या सर्व बदलांमुळे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार असले तरी नागरिकांनी वेळेवर कागदपत्रे अपडेट ठेवणे आवश्यक ठरणार आहे.

