(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील अत्यंत महत्वाचा समजल्या जाणाऱ्या ओणी-अणुस्कुरा घाट मार्ग दुरूस्तीसाठी शासनाने मोठा दिलासा दिला असून या मार्गाच्या डांबरीकरणासाठी बजेटमधून सुमारे पाच कोटी रूपयांची मंजुरी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यााबाबत अधिकृत माहिती देण्यात आली. सध्या १३ कि.मी. खड्डेमय भागाच्या डांबरीकरणासाठी हा निधी मंजूर असल्याची माहिती आहे.
ओणी ते अणुस्कुरा असा एकूण ३५ कि.मी. लांबीचा हा मार्ग गेल्या काही वर्षात वाहतुकीच्या वाढत्या वर्दळीमुळे खराब झाला आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क साधण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्वाचा ठरत असून कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली या भागांकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ येथे वाढली आहे. चार वर्षापूर्वी पावसाळ्यात दरडी कोसळल्याने इतर घाटमार्ग बंद झाले होते. त्या काळात अणुस्कूराघाट हा राजापूर व कोल्हापूरला जोडणारा एकमेव पर्यायी मार्ग ठरला होता. तेव्हापासून या रस्त्यावर वाहतुकीचा ताण अधिकच वाढला आहे. मागील पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरूपात दुरूस्ती केली असली तरी सततच्या वाहतुकीमुळे खड्डे पुन्हा उखडू लागले होते. त्यामुळे आगामी पावसाळ्यात वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार अशी भीती व्यक्त होत होती.
दरम्यान सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर शासनाने या मार्गावरील सुमारे १३ कि.मी. खड्डेमय भागाच्या डांबरीकरणासाठी निधी मंजूर केला आहे. लवकरच या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. या निर्णयामुळे पावसाळ्यापूर्वी किमान काही अंतराचा रस्ता सुस्थितीत येण्याची अपेक्षा व्यक्त होत असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

