(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील करक येथील अर्जुना धरण प्रकल्पांतर्गत प्रकल्पग्रस्त नागरिकांना शौचालय बांधणीसाठी रुपये १२,००० अनुदानाचे धनादेश शुक्रवारी (३ एप्रिल) वितरित करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गावातील स्थानिक रहिवासी तसेच मुंबईत वास्तव्यास असलेले अनेक प्रकल्पग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक आमदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धनादेशांचे वाटप होणार असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र काही नागरिकांनाच धनादेश वाटप करण्यात आले. तर अनेकांना प्रत्यक्षात धनादेश वाटप न करता, केवळ भविष्यात अनुदान मिळावे यासाठी अर्जाचे नमुने भरून घेण्यात आले. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी आपली दिशाभूल झाल्याची तीव्र भावना व्यक्त केली.विशेषतः मुंबईहून आलेल्या नागरिकांना प्रवासाचा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला.
कोणतीही ठोस मदत न मिळाल्याने त्यांना निराश होऊन परतावे लागले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. शौचालय अनुदानाचे धनादेश तात्काळ वितरित करावेत, संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाची चौकशी करावी आणि भविष्यात अशा प्रकारे नागरिकांची दिशाभूल होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या घटनेमुळे प्रकल्पग्रस्तांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत असून, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

