(चिपळूण)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे शनिवारी मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील कार पलटी झाल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक संजय भंडारी (वय २८, रा. कांची, ता. नाशिक) हा आपल्या मित्रांसह महिंद्रा XUV300 (MH 15 JH 0516) या कारने गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी निघाला होता. परशुराम घाट परिसरात आल्यानंतर चालकाने भरधाव वेगात वाहन चालवताना नियंत्रण गमावले. परिणामी कार रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन पलटी झाली.
या भीषण अपघातात रोहित संतोष भालेकर (वय २८, रा. इंदिरानगर, नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कृष्णा संपत आढाड (वय ३१, रा. चापडगाव, ता. निफाड), संदीप चंद्रभान डिंगरे (वय ३६, रा. पळसे, नाशिक) तसेच चालक प्रतीक भंडारी हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र, चिपळूण येथील पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक इश्वर्द बेग यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल खोंडल आणि नटे यांनी तत्परतेने मदतकार्य केले.
या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

